नवी मुंबई - पनवेलमधील दुदंरे गावातील शारदा माळी (55) या महिलेचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा करू नये, यासाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या आरोपींवर कडक कारावाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यानंतर गुरुवारी रात्री पाच आरोपींवर हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्यासारखे गुन्हे दाखल केले.
दरम्यान या प्रकरणातील फरार असलेल्या चार आरोपींना शुक्रवारी सकाळी पनवेलमधील एका गावातून चार आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन मुलगी आहे.
हेही वाचा - वाकोल्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या
पनवेल तालुक्यातील दुदंरे या गावातील शारदा माळी या महिलेला सोन्याचे मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून निर्घृणपणे मारण्यात आले. आरोपींनी शारदा माळी या महिलेला घराची कडी लावून विवस्त्र केले, त्यांचे केस जाळून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना फासावर लटकवण्यात आले. असा आरोप शारदा माळी यांचे पती गोविंद माळी यांनी केला होता.
या प्रकरणी सुरवातीला आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांची या प्रकरणी भेट घेतली. महिलेच्या शवविच्छेदनातही काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने पोलिसांनी काल रात्री उशिरा पाच आरोपींवर हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदवला.