मुंबई : राज्यातच नव्हे तर देशात मुली बेपत्ता होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था योग्य प्रकारे राबविली जात असल्याचं शिंदे - फडणीस सरकार म्हणत असले तरी, मुलींच्या बेपत्त्या होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून चिंता व्यक्त केली आहे. यावर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे तसेच महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
काय आहे सुप्रिया सुळे यांचे ट्विट: बेपत्ता मुलींनबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत हा अतिशय गंभीर विषय असल्याचे सांगितले आहे. गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत काम करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की, महाराष्ट्र सह देशात मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.
या बेपत्ता मुलींचे काय होते?: मुलींची दिशाभूल करून, त्यांना फसवून, त्यांचे अपहरण केले जात आहे. यानंतर या बेपत्ता मुलींचे पुढे काय होत असेल, हा प्रश्न शासनाला का, पडत नाही? व जर पडत असेल तर त्यावर त्यांनी उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही केले जात आहे का? त्याचसोबत या महिलांच्या संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ, स्वयंसेवी संस्था यांची मते जाणून घेणे घेऊन त्यावर उपाययोजना करणे फार गरजेचे आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात ५५१० मुली बेपत्ता: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, रूपाली चाकणकर यांनी तर यासंबंधा मध्ये आकडेवारी समोर आणली आहे. राज्यात दररोज सरासरी ७० मुली गायब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या तीन महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ५५१० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. राज्यात जानेवारी महिन्यात एकदा ६००, फेब्रुवारी महिन्यात १ हजार ८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्याचं त्यांनी म्हटले आहे. तसेच बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही फार चिंताजनक बाब आहे.
मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार: अनेक प्रकारची आश्वासन, आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. त्यात लग्न असेल, प्रेम प्रकरण असेल किंवा नोकरीच आमिष असेल. त्याचबरोबर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचारही केले जातात. विशेषतः शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण फार मोठ आहे. पुणे, अहमदनगर, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचंही रूपाली चाकणकर यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात गृह खात्याने लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.
गृहमंत्री जेलमध्ये जाऊन आलेत? : सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भाष्य करताना, भाजप नेते, माजी विरोधी पक्ष नेते, प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, हा विषय गंभीर असून त्यावर दुमत असण्याचे काही कारण नाही. परंतु भावना स्वच्छ व प्रांजल असायला हवी. सरकारवर द्वेषारोप करायचे तर त्या अगोदर गृहखात नव्हते का? गृहमंत्री या अगोदर नव्हते का? अशा प्रकारच्या घटना कालच झाल्या आहेत का? असे सांगत तुम्हाला गृह खात्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही . कारण आपले गृहमंत्री जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्यांचा कारभार फक्त राज्याने नाही तर देशातील करोडो जनतेने पाहिला आहे.
सुप्रिया सुळे व चाकणकर यांना टोला: आताचे गृहमंत्री निष्कलंक असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप नाही किंवा डाग नाही आहे. ते आपल्या कर्तव्याने कायदा व सुव्यवस्था उत्तम सांभाळत आहेत. ते कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाहीत. तसेच याबाबत ते अत्यंत कठोर असून सर्व आकडे पाहिले तर ते कमी करण्यासाठी शोध मोहीम सुद्धा राबवण्यात येत आहे. तुम्हाला त्यांचे काम दिसत नसल्याचा टोलाही, प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे व चाकणकर यांना लगावला आहे.