मुंबई - युतीच्या जवळपास सर्वच उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. मात्र, ईशान्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटला नाही. या जागेवर आमदार प्रकाश मेहता यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या ठिकणचा युतीचा वाद शमला असला तरी शिवसैनिकांमध्ये किरीट सोमय्या यांच्याबाबत नाराजी आहे. सोमय्या यांनी निवडणूक लढवल्यास त्यांना मदत करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. तसेच सोमय्या यांनी मागील ४ वर्षात मातोश्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे सोमय्याविषयी शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
बहुसंख्य गुजराती भाषिक मतदारसंघ असलेल्या या भागात ताकदीचा उमेदवार देण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. यामध्ये आमदार प्रकाश मेहता यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या नावावर येत्या २ दिवसांत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.