मुंबई - आरेत मेट्रो कारशेडसाठी चालु असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पवईतील नीती गेट समोर वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान स्थानिक पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतले होते. मात्र, समर्थकांनी व्हॅनसमोर अटकाव केल्याने पोलीस आंबेडकर यांना गाडीच्या खाली उतरवून चालत पवई पोलीस स्टेशनच्या दिशेला घेऊन गेले होते. दरम्यान, पोलिसांनी काही वेळ पोलीस ठाण्यात बसवून कोणताही गुन्हा व नोंदवता आंबेडकर यांना सोडून दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ए.आर. अंजरिया यांनी दिली आहे.
आरे गेटवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे अखेर पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकदेखील झाली. प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी त्यांच्या गाडीतून खाली उतरवल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर पवई पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
हेही वाचा - आरेत दुसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे...
यावेळी, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंबेडकर आणि त्यांच्या काही पदाधिरकाऱ्यांना पोलिसंनी आयपीसी 68 नुसार ताब्यात घेतले होते. नंतर आयपीसी 69 नुसार त्यांना सोडण्यातही आले आहे. यादरम्यान कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून समाजमाध्यमांवर अफवा पसरवू नये, असे आवाहनही अंजरिया यांनी केले आहे. दरम्यान आरे मध्ये आम्ही मेट्रोचे कारशेड होऊ देणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली आहे.