मुंबई - विधानसभेसाठी अद्याप कुठल्याही पक्षाशी संपर्क साधला नाही. २८८ जागांसाठी वंचितची तयारी आहे आणि त्यासाठी ३० जुलैला पहिली यादी जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच राज्यात वंचित बहुजन आघाडीला दोन अंकी जागा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीला भाजपने हरवले नाही, तर ईव्हीएमने हरवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला १५ तारखेची वेळ मागितली आहे. ईव्हीएम घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मतांमध्ये फरक असलेल्या ठिकाणी न्यायालयात धाव घेणार आहे. तसेच पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देखील जाणार आहे. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वच पक्ष सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस बैठकीत वंचित बहुजन आघाडी भाजपची बी-टीम असल्याचे आरोप झाले होते. मात्र, आता त्यांनी बी टीम असल्याचे पुरावे द्यावे. नाहीतर ४० लाख मतदारांची माफी मागावी, असेही ते म्हणाले. तसेच अशोक चव्हाण म्हणाले होते की, आम्ही बहुजन आघाडीसोबत जायला तयार आहोत. मात्र, बहुजन आघाडीचे सध्याचे स्टेट्स काय आहे? याचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले.