मुंबई Prajakt Tanpure News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पीएमएलए न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. प्राजक्त तनपुरे यांना राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टानं समन्स जारी केलं होतं. ईडीकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात 13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. तसंच त्यांच्यावर 26 कोटी 32 लाखांचा कारखाना 12 कोटी 95 लाखात नाममात्र दरात विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांना वैयक्तिक 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. यामुळं प्राजक्त तनपुरे यांना मोठा दिलासा मिळालाय.
प्राजक्त तनपुरेंवर काय आहे आरोप : प्रसाद शुगर अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट ली. आणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा ली या कंपन्यांबाबत कोर्टानं अद्याप कोणता आदेश दिलेला नाही. त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग करुन प्रभावाचा वापर करुन कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप आहे. महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेनं MRA मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर ईडीनं ECIR दाखल केलाय.
प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री असतानाच ईडीनं केली कारवाई : प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये ई़डीनं पहिल्यांदा कारवाई केली होती. त्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री होते. प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केली होती. त्यावेळी ईडीनं तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या होत्या. त्या जागांची किंमत 7 कोटी 60 लाख इतकी होती. तसंच ईडीनं 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली होती. यात नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन तर अहमदनगरमधील 4 एकर जमिनीचा समावेश होता.
हेही वाचा :