मुंबई - मागील दोन वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत यावर्षी ४१ अवयव दान ( Organ Donation ) झाले आहेत. हा आकडा त्यामानाने जास्त नसला तरी समाधानकारक ( An average of five organ donations per month ) आहे. झेडटीसीसीच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षात ४० अवयव दान ( Organ Donation Campaign ) खाजगी रुग्णालयात झाले आहेत. फक्त एक अवयव दान सरकारच्या जे. जे. रुग्णालयात झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक रुग्णांनाही अवयव दान मोहिमेत पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सन २०१८ मध्ये ४७, २०१९ मध्ये ७६, २०२० मध्ये ३०, २०२१ मध्ये ३२ तर २०२२ मध्ये आतापर्यंत ४१ अवयव दान झाले आहेत.
आजही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज - राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत ( Former Health Minister Dr. Deepak Sawant ) यांच्या म्हणण्यानुसार अवयव दानासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती ( Awareness for organ donation ) व्हायला हवी. शाळांमधून विद्यार्थ्यांपासून याची सुरुवात करायला हवी. तसेच ही सुरुवात केल्यानंतर ती थांबता कामा नये. यासंदर्भामध्ये प्रभात फेऱ्यांचंही आयोजन ठिकठिकाणी करायला हवं. कोविडच्या पूर्वी याप्रमाणे जनजागृतीचं काम होत होतं. पण कोविड दरम्यानच्या कालापासून ही जनजागृती पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अवयव दानासाठी ग्रीन कॉरिडोर- हव्या त्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत जागृती करण्याचं काम केले जात नाही. विशेष करून खाजगी रुग्णालयामध्ये अवयदान करण्यापेक्षा सरकारी रुग्णालयामध्ये अवयव दान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. जर ते झालं तर त्याचा उपयोग विशेष करून सर्वसामान्य जनतेला होईल. कारण खाजगी रुग्णालयामध्ये अवयव दान होत असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पैशाच्या देवाण घेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर यापूर्वी अवयव दानासाठी ग्रीन कॉरिडोर उपलब्ध करून दिले जात असत. आता ते प्रमाणही कमी झाले आहे. एकूणच काय तर लोकांमध्ये जागृती मोठ्या प्रमाणात व्हायला हवी, असही डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितले आहे.
कोल्हापूरच्या कुटुंबाने घातला आदर्श - याच आठवड्यात कोल्हापूर नजीक एका छोट्याशा गावातून ब्रेन ट्यूमरच्या उपचारांसाठी मुंबईत आलेल्या एका शेतकरी कुटुंबाने अवयव दानाचा ( farmer family from Kolhapur donated the organ ) नवा आदर्श घालून दिला आहे. या कुटुंबाच्या २४ वर्षीय तरुणीच्या मृत्युपश्चात त्यांनी अवयव दान करण्याचा संवेदनशी निर्णय घेतला. या मुलीचे पुढच्या महिन्यात लग्न ठरले होते. डोकेदुखी असह्य झाल्याने तिला खूप गंभीर स्थितीत जसलोक रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आणण्यात आले. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. या तरुणीने मृत्यूपश्चात यकृत, मूत्रपिंडे, फुफ्फुस दान केल्याने चार जणांना जीवदान मिळाले. यावरून अवयव दानाचे महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
वर्षाला दीड ते दोन लाख किडनीची गरज - आज भारतात दीडशे कोटीची लोकसंख्या असून सुद्धा भारतामध्ये फक्त दोन ते तीन टक्के अवयदान होत असल्याचं मेडी सिक्युअरचे डॉक्टर रुपेश वडगावकर यांनी सांगितले आहे. तसेच वर्षाला दिड ते दोन लाख किडनी ( Kidney donation ) ट्रान्सप्लांट ची गरज असते. यकृताची संख्या सांगायची झाली तर, यकृत ट्रान्सप्लांटसाठी वर्षाला ८० ते ८५ हजार यकृतांची गरज असते. परंतु आपल्याकडे फक्त दोन ते तीन टक्के लोकच अवयव दान करतात, म्हणूनच विशेष करून ब्रेनडेड किंवा अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अवयव दान मोठ्या प्रमाणात झाले. जर घरच्या लोकांची समजूत काढण्यात किंवा त्यांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आपण यशस्वी झालो तर, त्याचा मोठा फायदा इतरांना होईल, असेही डॉक्टर रुपेश वडगावकर यांनी सांगितल आहे.
जनजागृतीची गरज - त्याचबरोबर याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते जॉनी मिनेजीस यांनी सांगितल आहे की, ते मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात लोकांना जागृत करण्याचे काम करत आहेत. परंतु अद्यापही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याविषयी जनजागृती व्हायची गरज आहे. कारण भारतातील लोकसंख्या पाहता त्या तुलनेत फारच कमी प्रमाणामध्ये अवयव दानासाठी लोक पुढाकार घेताना दिसत आहेत.