मुंबई- मुंबईतील ख्रिस्ती धर्मीयांची विविध चर्च प्रसिद्ध आहेत. ही चर्च पोर्तुगीज आणि ब्रिटीशकालीन असून त्यापैकी दादर येथील पोर्तुगीज चर्च प्रसिद्ध आहे. 1596 साली बांधल्या गेलेल्या या चर्चला 400 वर्ष इतका जुना इतिहास आहे. मुंबईतील सर्व धर्मीय या ठिकाणी येऊन प्रार्थना करतात. नाताळ निमित्त चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून ख्रिस्ताचे दर्शन घेण्यासाठी आजपासून येथे भाविकांची गर्दी होणार आहे.
प्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिआ यांनी 1974 ते 1977 च्या दरम्यान नव्याने या चर्चची रचना केली होती. आणि त्यांच्यामुळे या चर्चला आधुनिक रुप मिळाले. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मसमभाव या ठिकाणी दिसतो. मुंबईकरांसाठी पोर्तुगीज चर्च या नावाने परिचित असलेल्या या चर्चचे नाव अवर लेडी ऑफ सॅलवेशन चर्च, असे आहे. चर्चच्या गेट जवळचा क्रॉस हा सुमारे 400 वर्ष जुना आहे. माहीम बेटावर वसलेल्या ईस्ट इंडियन समाजासाठी हे स्थळ कित्येक वर्ष प्रार्थनास्थळ म्हणून कार्यरत आहे.
शहरात ‘पोर्तुगीज चर्च’ या नावाने दोन ख्रिस्तमंदिर
मुंबईत ‘पोर्तुगीज चर्च’ या नावाने ओळखली जाणारी दोन ख्रिस्तमंदिरे आहेत. एक गिरगाव तर दुसरे दादर येथे आहे. गिरगाव येथील चर्च ‘संत तेरेजा’ हिला समर्पित केले आहे. तर दादर येथील चर्च ‘तारणाऱ्यांची माता पवित्र मरिया’ हिला समर्पित केलेले आहे. तारणाऱ्यांची माता या नावावरून ‘साल्वेशन चर्च’ हे नामाभिधान या चर्चला मिळाले आहे. माहीम बेटाच्या उत्तर बाजूला ‘सेंट मायकल चर्च’ तर त्याच बेटाच्या दक्षिणेला पूर्वीपासूनचे हे ‘साल्वेशन चर्च’. सदर साल्वेशन चर्च 1596 साली उभे राहिले.
जुन्या काळी उत्तरेकडील संत मायकल चर्च या विभागाला ‘अप्पर माहीम’ म्हणत तर जिथे साल्वेशन चर्च आहे त्या विभागाला ‘लोअर’ असे म्हटले जायचे. पश्चिम व मध्य रेल्वे या दोन्ही स्टेशनांचा संगम दादरला झाल्यामुळे अप्परच्या चर्चचे माहीम हे नाव कालबाह्य झाले व त्याला ‘दादर चर्च’ असे म्हणण्यात येऊ लागले. आज पोर्तुगीज चर्च, दादर या ऐतिहासिक वास्तूने जगप्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्या नेतृत्वाखाली आधुनिकतेचा नवा पेहराव पांघरलेला आहे. त्यामुळे, त्याचे पोर्तुगीजकालीन जुने स्वरूप सर्वस्वी पालटून गेले आहे. ‘पोर्तुगीज चर्च’ हे जुने नाव तेवढे राहिले आहे. परंतु, चर्चच्या बांधकामात पोर्तुगीजकालीन जुन्या चर्चचा आकार काही राहिलेला नाही.
हेही वाचा- महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी