मुंबई - पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने मुंबईतील मढ येथील का बंगल्यावर छापा मारून पोर्नोग्राफी चित्रीकरण करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर या संदर्भात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. सोमवारी या प्रकरणांमध्ये एका मोठ्या उद्योजकाचा माजी पीए म्हणून काम पाहणाऱ्या उमेश कामत या आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपीला न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - अभिनेत्री गेहना वशिष्ठने केली पोलिसात तक्रार दाखल
या 7 आरोपींना झाली आहे अटक
पोलिसांनी यासंदर्भात आतापर्यंत रुवा खान उर्फ यास्मिन, आरिफ शेख, भानु ठाकुर, मोनू शर्मा, प्रतिभा नलावडे, गहना वशिष्ठ व उमेश कामत या आरोपींना अटक केलेली आहे. मालमत्ता कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार गहना वशिष्ठ व यास्मिन हे दोघेही परदेशी आयपी अॅड्रेस वापरून एक पॉर्न वेबसाईट चालवत होते. अटक करण्यात आलेला उमेश कामत हा युकेमधल्या एका फर्मसाठी कॉर्डिनेटर म्हणून काम करत होता. गहना वशिष्ठकडून वुई-ट्रान्सफरच्या (WeTransfer) माध्यमातून आलेल्या पॉर्न लिंकला तो परदेशातील एका मोबाइल ॲपच्या माध्यमातून अपलोड करत होता.
हेही वाचा - अभिनेत्री गेहना वशिष्ठला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
स्ट्रगलर कलाकारांना हेरायची गहना वशिष्ठ
बॉलीवूड व टीव्ही सिरीयलमध्ये कामाच्या शोधात असलेल्या स्ट्रगलर कलाकारांना गाठून त्यांच्याकडून पॉर्न फिल्ममध्ये काम करून घेतले जात होते. यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामानुसार पाच हजार ते 20 हजार रुपये प्रत्येक दिवशी दिले जात होते. गहना वशिष्ठ व यास्मिन या दोघांवर फिल्ममध्ये काम करण्यासाठी स्ट्रगलर कलाकारांना हेरण्याचे काम देण्यात आले होते. सदरची पॉर्न फिल्म पाहण्यासाठी एका विशिष्ट वेबसाईटला दोन हजार रुपये दिल्यावरच त्याचे सभासद पद मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - पॉर्न फिल्म प्रकरणी उमेश कामतला अटक
गहनाने तिच्या घरावर अवैधरीत्या कब्जा केल्याची केली होती तक्रार
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मॉडेल व अभिनेत्री गहना हिने एका कुटुंबाने तिच्या घरावर चुकीच्या पद्धतीने कब्जा केल्याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तिचे हे घर भाड्याने देण्याची जबाबदारी तिने एका ब्रोकरला दिली होती. ज्या ब्रोकरला गेहनाने घर दिले होते त्याने चुकीच्या पद्धतीने घर जास्तीचे डिपॉजिट घेऊन भाड्याने दिल्याचे गहनाने म्हटले होते. तिने घराचा ताबा परत मागितल्यानंतर तेथे राहणाऱ्या लोकांनी तिला शिवीगाळ करत तिच्यावर बलात्कार करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तिने म्हटले होते. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचाही आरोप तिने केला होता.