मुंबई - बुथप्रमुख पदाधिकारी मेळाव्याच्या पत्रकात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने युवासेनाचा रोष भाजप खासदार पूनम महाजन यांना सामना करावा लागत आहे. ऐन निवडणुकीत कोंडी होऊ नये म्हणून रविवारी पुनम महाजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर गेल्या आहेत. जवळ जवळ अर्धा तास चाललेल्या बैठकीत महाजन यांनी आपली चूक मान्य करत यापुढे आदित्य ठाकरे यांचा प्रचार मोहिमेत सन्मान राखला जाण्याचे आश्वासन दिले आहे.
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गुजरातच्या दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे युती झाली असतानाही युवासेना प्रमुखांचा फोटो पत्रकावर न छापल्यामुळे युवासेना नाराज झाली आहे. यामुळे युवासेनेने भाजपच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार माफी मागत नाही, तोपर्यंत प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. युवासेनेच्या या भूमिकेमुळे पूनम महाजन यांची पुन्हा कोंडी झाली आहे. युवासेनेची मनधरणी करण्यासाठी त्या मातोश्रीवर गेल्या आहेत. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांनी बुथप्रमुख पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला नाही. आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने युवासेनेने वांद्रे पश्चिमेकडील शिवसेनेच्या शाखेबाहेर एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. आदित्य ठाकरे हे देशाचे युथ आयकॉन आहेत. त्यांना आमच्या नेत्याच्या फोटोची गरज नसेल, तर युवासेना पूनम महाजन यांचा प्रचार नसल्याचा निर्धार युवासेनेने केला होता.