मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवरून केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणात नव्हते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांवर ‘एक शरद बाकी गारद’ अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील अभ्यासाचा बेस पक्का करावा, त्यानंतर बोलावे असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामनाचे निष्ठावंत वाचक आहेत. त्यामुळे त्यांनी सुचवलेल्या अग्रलेखांच्या विषयाबाबत मी पत्रकार व लेखक असल्याने नक्की विचार करेल असे राऊत यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये 'एक शरद बाकी गारद' या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिले होते. त्यातील दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असे म्हटले होते. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच. तसेच ही मुलखात एकप्रकारे काढा आहे, राजकारणात सर्वकाही पचायला शिकायला हवे, असेही राऊत म्हणाले.
पोलिसांनी घेतला सहकाऱ्यांचा सूड
पोलिसांची भीती न राहिल्यास देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. पोलीस आपल्या सहकाऱ्यांचा बदला घेतात. मी फेक एन्काऊंटरचे केव्हाच समर्थन करत नाही. मात्र, आज जे घडले ते होणार होते, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी विकास दुबे एन्काऊंटरवर दिली.
विकास दुबेंसारखे लोक निर्माण केली जातात, ती अनेक राजकारण्यांची गरज असते. त्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी, पैसे गोळ्या करण्यासाठी, खंडण्या जमा करण्यासाठी काही राज्यात राजकारणी अशी लोक पोसतात तर पोलीसही अशा लोकांची निर्मिती करतात. याला जबाबदार राजकारण असून आता गुन्हेगारीच राजकारण होऊ लागले आहे. हे अत्यंत घाणेरडे आहे. पूर्वी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करत होते उलट आता गुन्हेगार राजकारण्यांचा वापर करत आहेत, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा- राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...