मुंबई - मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आरोग्य व्यवस्था देखील खराब अवस्थेत आहे. मात्र, या कठीण काळातही राजकीय पक्ष राजकारण सोडताना दिसत नाही. भांडुप येथील एका लसीकरण केंद्राचे महापौर किशोर पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, काही तासांपूर्वीच स्थानिक भाजप नगरसेविकेने या लसीकरण केंद्राचे उद्घाटन केल्यामुळे पुन्हा एकदा सेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत.
भांडुप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले रुग्णालय येथील लसीकरण केंद्राचे आज (दि. 29 एप्रिल) महापौर सकाळी 11 वाजता उद्घाटन करणार होत्या. मात्र, महापौर उद्घाटन करण्यापूर्वीच भाजपच्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी कार्यकर्त्यांसोबत जाऊन सकाळी आठ वाजता लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. मात्र, महापौर या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करणार हे आम्हला माहीतच नव्हते, असे सांगत साक्षी दळवी यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मला या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही
मला या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. या राजकारणाचा मला कंटाळा आलेला आहे. जर असे उद्घाटन झाले असेल तर मला त्याबद्दल काही बोलायचे नाही अधिकृतरित्या उद्घाटन झाले पाहिजे, असे मत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या प्रतिक्रिया देत लोकांनी नोंदणी केल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, ज्यांचा दुसरा डोस आहेत त्यांना प्राधान्य दिले जात आहे, असेही महापौर यांनी सांगितले.
हेही वाचा - 'काँग्रेसच्या 53 आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार'