मुंबई - राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंर कांजूर मार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबविण्यात आले आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. यासोबतच एमएमआरडीएला आतापर्यंत झालेले काम जैसे थे ठेवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत कारशेड हलवलं अहंकारापोटी, आदित्य ठाकरेंना भविष्य आहे अभ्यास करून बोलावं असं म्हटलं आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून पुन्हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती. मात्र, ही जमीन जिल्हाधिकार्यांनी एमएमआरडीएला हस्तांतरित केल्याच्या निर्णयायावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. यावर आज (बुधवार) उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. आता कांजुरमार्गच्या कामाला स्थगिती मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमीश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याचा आढावा..
कांजूरमार्ग प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरेंनी केवळ अहंकारापोटी हा प्रकल्प आरेमधून कांजूरमार्गला हलवला. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देऊन त्यांना मोठी चपराक दिली असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले, उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला कारशेडचे काम थांबवायला सांगितले आहे, त्यामुळे तिथे काम होणार नाही. जरी तिथे मंजुरी मिळाली असती तरी, तिथे कार शेड बांधणे चुकीचे आहे. जवळपास साडेपाच हजार कोटींचा फटका राज्याच्या तिजोरीवर पडला असता, मात्र, राज्य सरकार हा अट्टाहास का करतेय हे कळत नसल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.
मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे काम
आरेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. तसेच सौनिक समितीचा अहवलानुसार आरेमध्ये ग्रीन कारशेड निर्माण करता आले असते. मात्र, केवळ अहंकारापोटी मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. राज्य सरकारला कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसलीय. काही अधिकाऱ्यांना लक्षात आले, यात मुख्यमंत्र्यांचा इगो आहे. मात्र इगोसाठी मुंबई मेट्रोचे काम थांबवणे चुकीचे असल्याचेही फडणवीस म्हणाले.
मुंबईच्या मेट्रो कामात कोणी मिठाचा खडा टाकू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात विरोधकांना सुनावले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयानेच मिठाचा खडा पडला आहे. अशा प्रकारे ते जर निर्णय घेत राहिले तर त्यांच्या या निर्णयामुळे २०२४ मध्ये मुंबईकरांना मेट्रो मिळेल. असेही फडणवीस म्हणाले.
हट्ट सोडा... नाही तर मेट्रो होणारच नाही-
तसेच केंद्राच्या माध्यमातून मेट्रोच्या कामासाठी जायकाकडून ५० टक्के निधी मिळतो. त्यांनी जर त्यांना नकार दिल्यास मेट्रो होणार नाही, अशी शक्यताही फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने आरेमध्ये मेट्रोचे काम सुरू करावे, आम्ही टीका करणार नाही, हा आमचा विजय ही भावना आम्ही ठेवणार नाही, आम्हाला मुंबईकरांचा विजय झालेला पाहायचे असल्याचेही फडणवीस म्हणाले.
ठाकरेंनी राजीनामा द्यावा-
कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले आहेत. यावर आरे परिसरातील कारशेडला स्थगिती देऊन तो प्रकल्प कांजूरमार्गला हलवला. मेट्रो कारशेडसाठी लागलेला खर्च आणि आता होणारा खर्च याला आता जबाबदार कोण ? असा सवाल करत याबद्दल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. तसेच पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
...तर सरकारचे ५५०० कोटी रुपये वाचतील - आदित्य ठाकरे
कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला उच्च न्यायालायने स्थगिती दिल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही जागा मुंबईच्या मेट्रो लाईन क्रमांक ६, ४ आणि १४ साठी अत्यंत्य महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी कारशेड झाल्यास सरकारचे जवळपास ५५०० कोटी रुपये वाचणार आहेत. आणि सुमारे एक कोटी नागरिकांच्या फायद्याचा प्रकल्प ठरेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री व शिवसेनेचा अहंकार जबाबदार आहे - अतुल भातखळकर
भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की,कांजूरमार्ग येथील मेट्रो कार्ड शेडचे काम कोर्टाने आज तात्काळ थांबवायला सांगितले आहे हा दुर्दैवी निर्णय आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री त्यांची कार्यपद्धती ती आणि त्यांचा अहंकार आहे. हा घटनाक्रम 2015 ला कोर्टात झाला होता. त्यामुळेच तात्कालीन सरकार देवेंद्र फडणवीस यांनी हा कारशेड आरे येथे बनवण्याचा निर्णय घेतला होता. मेट्रो किमान पाच वर्ष मुंबईकरांना अजून मिळणार नाही असा आहे. या सर्वाला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आणि शिवसेना आहे अशी भातखळकर यांनी टीका केली आहे.