मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरयांचे गोव्यात रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाजपने सच्चा कार्यकर्ता, श्रेष्ठ नेता गमावला - रावसाहेब दानवे
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने एक सच्चा कार्यकर्ता आणि श्रेष्ठ नेता गमावला आहे. अत्यंत तडफदार, निस्पृह आणि कार्यक्षम नेते म्हणून ते परिचित होते, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी मनोहर पर्रिकरयांना श्रद्धांजली अर्पण केली.
दानवे म्हणाले, की मनोहर पर्रिकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोव्यात भाजपची उभारणी केली व पक्षाला सत्तेवर आणले. त्यांनी गोव्याला राजकीय स्थैर्य दिले आणि स्वच्छ - पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातून या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेले. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांची कारकीर्द महत्त्वाची होती. त्यांनी संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणास आणि शस्त्रसज्जतेस चालना दिली. त्यांच्या कारकीर्दीत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त करणारा पहिला सर्जिकल स्ट्राईक केला असेही दानवे यावेळी म्हणाले.
साधेपणा सहजता हे मनोहर पर्रिकर यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी नेहमीच पक्ष आपल्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे तत्व मानले. भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांशीही ते सदैव आपुलकीने वागत असत असेही दानवे यांनी सांगितले.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे. आपण त्यांना महाराष्ट्र भाजपतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.
पर्रिकरांच्या निधनाने शोक झाला - नारायण राणे
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी मनोहर पर्रिकरयांच्या निधनाने शोक झाल्याचे म्हटले आहे. गोव्याच्या विकासात मनोहर पर्रिकरयांचा सिंहाचा वाटा आहे. उच्चविद्याविभूषीत असलेल्या मनोहर पर्रिकरयांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे संभाळली असेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.