नवी मुंबई - राज्यात आयाराम गयाराम यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच असून आता नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले गणेश नाईक यांच्यासोबत पक्षाचे सर्व 52 नगरसेवक हे देखील पक्षाचा राजीनामा देऊन भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या तोंडावर नवी मुंबईत राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.
याचे पडसाद नवी मुंबई महापालिकेतही दिसून येत आहेत. म्हणून आज दुपारी 12 वाजता नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनी सर्व नगरसेवकांची बोलावलेल्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत नगरसेवकांची मत जाणून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 52 नगरसेवक सध्या पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासूनच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला मोठे खिंडार बसणार आहे. नवी मुंबई महापालिका सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु नवी मुंबईतील सर्वच्या सर्व नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास भाजपची आणखी एका महापालिकेवर सत्ता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे 12 नगरसेवक हे संदीप नाईक यांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्यास इच्छूक असल्याचे, कार्यकर्त्यांने सांगितली.
इतकेच नव्हे, तर गणेश नाईक यांच्या पाठोपाठ एरोली मतदारसंघातील आमदार संदीप नाईक हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपूर्वी गणेश नाईक आणि संदीप नाईक हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. मात्र, संदीप नाईक यांनी या केवळ अफवा असल्याचे सांगून चर्चेवर पांघरूण घातले होते. मात्र, आजच्या बैठकीनंतर हे चित्र स्पष्ट होईल असे दिसत आहे.