मुंबई PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर येथे एका गृह प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी हे सातत्याने महाराष्ट्रातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये आलेले पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांनी नुकतीच हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईत अटल सेतू प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा लगेचच सोलापूर जिल्ह्यात ते विकास कामाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पंतप्रधानांचे महाराष्ट्रातील वाढलेले दौरे हे आगामी लोकसभा निवडणुका पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. पंतप्रधानांचे हे दौरे म्हणजे केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली मतदार पेरणीच आहे असा आरोप, विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी जोरदार टीका केली आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात : महाराष्ट्रमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा दौरे वाढताना आपल्याला दिसत आहेत. याचं कारण की, 2024 ला येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. 14 ते 23 हा त्यांचा कार्यकाळ फक्त त्यांनी या देशाला, या राज्याला फक्त आश्वासन दिलंय. आश्वासनाची पूर्ती मात्र काही झाली नाही, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय. यासंदर्भात बोलताना कुलकर्णी म्हणाले की, प्राथमिक उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर सोलापूर सारख्या या जिल्ह्याच्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या यापूर्वी दोनदा सभा झाल्या होत्या. दोन्ही वेळेला त्यांनी उडाणच्या नावाखाली सोलापूरचा समावेश केला. उडानमध्ये आम्ही सोलापूरचा समावेश करू आणि या ठिकाणी आपण विमानसेवा चालू करू असं सांगितलं. तर सोलापूरच्या काही भागात गारमेंट कंपन्या आहेत. सैन्यातील गणवेशासाठी तुम्हाला आम्ही काम देऊ आणि तयार कपडे घेऊन जाऊ अशा प्रकारचं आश्वासन सोलापूरकरांना दिलं होतं. सोलापूरमध्ये रिंगरोड असतील, सोलापूर मधल्या मेट्रो असतील अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं. परंतु त्या आश्वासनं सगळी हवेत विरली गेली. 2019 ला दिलेल्या आश्वासन 2024 उजाडले पण कोणतेही आश्वासनाची पूर्ती झाली नाही. पुन्हा एकदा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूरच्या लोकांना गाजर दाखवण्याचं काम नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा करणार आहेत. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे इथला मतदार राजा हा मतपेटीतून नरेंद्र मोदींना योग्य उत्तर देईल, असा दावाही कुलकर्णी यांनी केलाय.
पायाखालची वाळू सरकल्याने दौरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास कामांच्या दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात येत आहेत. कारण त्यांना महाराष्ट्रातील मतदारांकडून लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात मतदानाची अपेक्षा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडून 43 खासदार महायुतीचे निवडून गेले होते. ज्याचा मोदींना खूप मोठा पाठिंबा मिळाला. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता महायुतीला जनतेमधून पाठिंबा मिळत नाही असे अनेक सर्वेक्षणाचे निकाल बाहेर आले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा मतदारांमध्ये वातावरण निर्मिती करायची असेल तर पंतप्रधान मोदी यांचा चेहरा दाखवला गेला पाहिजे. कारण, राज्यातील सरकार आणि राज्यातील नेते हे कुचकामी ठरत आहेत. राज्यातील जनता ही महाविकास आघाडीच्या पारड्यात मत टाकेल अशी परिस्थिती असल्यामुळं आता महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात अधिकाधिक दौरे आखले जात आहेत. मात्र आता कितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा महायुतीने प्रयत्न केला तरीसुद्धा जनता फसणार नाही. यांनी आता शुभारंभ केलेल्या विकास कामे पूर्ण व्हायला किती वेळ लागणार आहे. केवळ जनतेला फसवण्यासाठी विकास कामांचं उद्घाटन करायचं आणि त्याआधारे मत मागायची हाच डाव आहे. मात्र आता जनता त्याला फसणार नाही, असं मत आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. धनंजय शिंदे यांनी व्यक्त केलंय.
मोदी केवळ विकासासाठी दौऱ्यावर : या संदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला किंवा नरेंद्र मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतांसाठी फिरण्याची गरज नाही. कारण गेल्या नऊ वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारने केलेली विकास कामे आणि देशाचा झालेला विकास हा सर्वांसमोर आहे. मोदी यांचे दौरे हे केवळ पूर्वनियोजित आणि विकास कामांसाठीच आहेत. त्यामुळं विरोधकांनी काहीही म्हटलं तरी त्याचा फरक पडणार नाही.
45 जागांच्या उद्दिष्टासाठी दौरे : राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून किमान 45 जागा लोकसभेच्या निवडून याव्यात अशी अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूरमध्ये विद्यमान खासदाराची जागा धोक्यात असल्यामुळं प्रणिती शिंदे या निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं या जागेवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा हेमंत गोडसे हे अडचणीत असल्यामुळं नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे बारामतीवर त्यांचे सातत्याने लक्ष आहेच. एकूण काही झालं तरी महाराष्ट्रातून 45 जागा निवडून आणायच्या हेच उद्दिष्ट ठेवून त्यांनी हे दौरे सुरू केले आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षासमोर जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून आणणे हा उद्देश असल्यामुळंच आता पंतप्रधान मोदी यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले असल्याचं भावसार यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा -