मुंबई- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात पोलिसांनी अनेक गरजुंना मदत केली. जीवाची पर्वा न करता पोलीस संकटाशी कोरोना काळात लढा देत आहेत. त्यामुळे पोलिसांना कोरोना योद्धा म्हणून संबोधण्यात आले. पोलिसांच्या मानुसकीचे दर्शन अनेक वेळा घडले आहे. त्यातच मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश गायकवाड यांनी बुधवारी ओपन हार्ट सर्जरी होणाऱ्या एका छोट्या मुलीला स्वतःचे रक्त देऊन माणुसकीचे नाते जपले आहे.
हिंदुजा रुग्णालयात बुधवारी एका १४ वर्षांय सनाफातिम खान या छोट्या मुलीला अचानक ओपन हार्ट सर्जरीवेळी A+ रक्तगटाची गरज भासली. मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाही. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णालयात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलीस ठाण्याचे पोलीस आकाश बाबासाहेब गायकवाड यांनी माणुसकी हाच आपला धर्म समजून संकटप्रसंगी रक्तदान केले. कोणत्याही संकटसमयी पोलीस देवदूत बनून मदतीला येतात हे यातून पुन्हा सिद्ध झाले.