मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिकरित्या सण, उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही काळाचौकी येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निर्बंध असतानाही दही हंडी फोडली आहे. या प्रकरणी बाळा नांदगावकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
हिंदूंचे सण साजरे करायचे नाहीत का? आंदोलने चालतात, राजकीय जन आशीर्वाद यात्रा चालते, तिथे कोरोना येत नाही का? मात्र, आमचा हिंदूंच्याच सणांना परवानगी का नाही? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला. कोरोनाचे नियम पाळून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडू द्या. आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळणार होतो. मात्र, पोलिसांनी त्यालासुद्धा नकार दिला. त्यामुळे आम्हाला अशाप्रकारे दहीहंडी फोडावी लावली आहे.
हेही वाचा - सरकार सणांच्या नाही, कोरोनाच्या विरोधात; मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले
शेकडो कार्यकर्त्यांवर कारवाई -
कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहे. तर दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे, पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. तरी बाळा नांदगावकर आपल्या कार्यकर्त्यांसह राज्य सरकारचा आदेश झुगारुन दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी काळाचौकीत आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची अडवणूक केली. तेव्हा बाळा नांदगावकर जिथे पोलिसांनी अडवले तिथेच दही हंडी फोडली. त्यानंतर पोलिसांनी बाळा नांदगावकरसह शेकडो कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे.