मुंबई : आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात महिला पोलिसांना आठ तास ड्युटीची भेट दिली होती. पण पोलीस खात्यातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचा वेळ मात्र अजून निश्चित नाही. नोकरीची वेळ निश्चित नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ताण-तणाव वाढला: पोलीस दलात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढू लागले आहेत. नुकतेच खार पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुनील बने यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्रपाळीत कर्तव्य बजावून घरी आले होते. त्यानंतर त्यांचा हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला. सहायक फौजदार सुनील बने हे व्यायाम जॉगिंग नियमितपणे करत होते. तरीही त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या निधनाचा सर्वानाच धक्का बसला आहे.
पोलीस कर्मचारी नाराज : त्यामुळे पोलिसांवरील ताणाचा मुद्दादेखील पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला. दुसरीकडे पोलिसांना आठ तास ड्युटी या योजनेची अंमलबजावणी सात वर्षांनंतरही केली जात नसल्याने पोलिसांमध्ये नाराजी वाढत आहे. मुंबईतील सुरक्षेसह शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पार पाडत असलेल्या मुंबई पोलिसांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. रोजच्या कर्तव्याचे तास निश्चित नसल्याने कामाचा तणाव वाढत आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस एकदा घरातून कर्तव्यासाठी निघाला की त्याचे घरी परत येण्याची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबीय देखील त्रासले असतात.
१२-२४ च्या पॅटर्नला नकार: पोलीस दलातील कर्तव्याला किमान १२ तास आराम २४ तास कामला तरी निदान प्राधान्य द्यावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आठ-आठ तासांचे गाजर काही महिने दाखवून पुन्हा जैसे तेचा कारभार पोलीस दरात सुरूच झाला आहे. काही ठिकाणी वरिष्ठ ऐकत नाही, तर काही ठिकाणी विचार ऐकत नसल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
काय होता प्रस्ताव?: अन्य आस्थापनांप्रमाणेच मुंबई पोलिसांच्या ड्युट्या ८ तास कराव्यात. याप्रकारचा प्रस्ताव पोलीस ठाण्यातील रवींद्र पाटील यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासमोर मांडला होता. ५ मे २०१६ ला देवनार पोलीस ठाण्यासोबत काही पोलीस ठाण्यांमध्ये आठ तास ड्युटीचा प्रयोग सुरू करण्यात आला होता. हा उपक्रम यशस्वी ठरू लागल्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबवण्यासाठी पळसळगीकर यांनी प्रयत्न केले.
लॉकडाऊनमध्ये उपक्रम पडला बंद: वर्ष २०१७ मध्ये १ जानेवारीला मुंबईत याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पडसाळगीकर यांनी घेतला. आठ तास ड्युटीच्या उपक्रमाचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी त्यांनी पाटील यांच्याकडे दिली. तेव्हापासून पाटील यांची कक्ष आठमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला चार जण त्यांच्यासोबत कर्तव्यावर होते. लॉकडाऊनच्या काळात हा उपक्रम बारगळला असून तो परत चालू झालेला नाही.