मुंबई- १४० क्रमांकावरुन येणारा फोन उचलल्यास आपल्या बँक खात्यातून पैशांची लूट होवू शकते, अशा आशयाचा मेसेज आणि मेगाफोन घेत एक पोलीस याबद्दल आवाहन करतानाचा व्हिडिओ प्रचंड वायरल होतोय. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ पोलिसांचा नसून एका नामांकित वाहिनीने तयार केल्याचे ट्विट महाराष्ट्र सायबर या महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाऊंट वरुन करण्यात आले आहे.
१४० क्रमांकावरुन येणाऱ्या फोन बद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ नामांकित वाहिनीने त्यांच्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे कळते आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली आहे. मुंबई पोलीस याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका वाहिनीच्या मालिकेच्या शूटिंग दरम्यान तयार केलेला असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. व्हिडिओत एक पोलीस नागरिकांना १४० क्रमांकाच्या नंबर वरून कॉल केल्यास आपल्या खात्यातील पैसे निकामी होतील म्हणून सर्वांनी सतर्क रहा, असा संदेश देत आहे.
पोलिसांनी त्या वाहिनीला कोरोना संकटाच्या काळात अशा प्रकारचे प्रमोशन थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संबंधी सायबर सेल अधिक तपास करत आहे.
१४० क्रमांकाच्या फोन कॉल बद्दल नागरिकांनी घाबरु नये. यासंबंधीच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही फोन कॉलवर आपल्या बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी बद्दल माहिती देऊ नये, असेही पोलिसांनी सांगितले आहे.