मुंबई Police Death Due to Manja : कामावरुन घरी परतताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर काळानं घाला घातलाय. गाडीवरुन जाताना पतंगाचा मांजा गळ्याला लागल्यानं गळा चिरुन पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. समीर सुरेश जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
धारदार मांजानं चिरला गळा : वरळी येथील बीडीडी चाळीत कुटूंबीयांसोबत वास्तव्यास असलेले समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून नेमणुकीला होते. समीर रविवारी दुपारी काम आटोपून दुचाकीवर घरी परत जात होते. या दरम्यान वाकोला पुलावरुन जात असताना अचानक त्यांच्यासमोर पतंगाचा मांजा आला. मांजापासून वाचविण्याच्या प्रयत्नात असताना या धारधार मांजानं त्यांचा गळा चिरला गेला. गळ्यातून रक्त येत असल्याचं पाहून स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात ते दुचाकीवरुन खाली पडले. हा प्रकार एका वाहनचालकानं पाहताच त्यानं काही अंतरावर गस्तीवर असलेल्या खेरवाडी पोलिसांना याची माहिती दिली.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू : घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. गंभीर अवस्थेत पडलेल्या जाधव यांना सायन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या खिशातील ओळखपत्रामुळं त्यांची ओळख पटली. ते पोलीस दलात असल्याचं समजल्यावर दिंडोशी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांच्या मृत्यूच्या वृत्तानं वरळी बीडीडी चाळीवर शोककळा पसरलीय. याप्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.
- माजामुळं अनेकांचा मृत्यू : नायलॉनच्या मांजामुळं दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. तसंच पक्ष्यांच्या जीवासाठीही ते अत्यंत धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं नायलॉनच्या मांजावर बंदी आणावी यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. विशेषतः या मांजामुळं अनेकदा दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागलाय. चायनीज मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई व्हावी, अशी सुजाण नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :