मुंबई - पवईमध्ये निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वे पोलिसांत हवालदार म्हणून कार्यरत असणाऱ्या आपल्या मुलाचीच हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलगा सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने आरोपी गुलाब गलांडेने हे टोकाचे पाऊल उचलले. पवई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्यास 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई परिसरात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण, एकाचा मृत्यू
मद्यप्राशन करून मुलगा कुटुंबातील सदस्यांना सतत वाद घालून शिवीगाळ व त्रास देत असल्याने मुलाच्या या रोजच्या त्रासाला सर्वच वैतागले होते. त्यामुळे वडिलांनी मुलाची हत्या केली. पवईच्या आद्य शंकराचार्य मार्ग पंचकुटीर परिसरातील गणेश नगर मधील ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुलाब गलांडे (वय-61) यांना अटक केली आहे. गलांडे यांचा सोमवारी मुलगा हरीश गलांडे (वय-40) यांच्याशी वाद झाला होता. हरीश हा अंधेरी रेल्वे पोलिसांमध्ये हवालदार म्हणून काम करत होता. तर आरोपी गुलाब गलांडे मुंबई पोलिस दलात 15 वर्ष सेवा बजावून निवृत्त झाले. ते सध्या पवईतील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
हरीशला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो पत्नी आणि मुलांना त्रास देत असे. या वादात आई-वडील आल्यानंतर त्यांनाही त्याने त्रास देणं सुरू केले होते. सोमवारी रात्री हरीश दारू पिऊन आला. तो वडिलांशी वाद घालू लागला. यातच हरिशने वडिलांच्या अंगावर घरातील वस्तू फेकून मारल्याने संतापलेल्या वडिलांनी रागात त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यात हरीश जखमी झाला त्यास जवळील दवाखान्यात पोलिसानी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी पवई पोलिसांनी गुलाब गलांडेला अटक केली आहे.