मुंबई: महाराष्ट्र पोलीसांनी राज्यस्थित सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना ईडीच्या तक्रारीनंतर अटक केली आहे. ते त्यांच्या छाप्यांमध्ये अडथळा आणत होते, आणि पुरावे नष्ट करत होते, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. हे प्रकरण पुणेस्थित सेवा विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. ही धाड सुमारे 494 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाच्या मनी लाँड्रिंग तपासाशी संबंधित आहे.
जबाब नोंदवले: अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने 27 जानेवारी रोजी पहाटे पिंपरी-चिंचवड परिसरातील मुलचंदानीच्या आवारात छापा टाकला. परंतु कोणीही घर उघडले नाही, म्हणून त्यांची टीम घरात जाऊ शकली नाही. त्यानंतर ईडीने कुलूप तोडणाऱ्या लॉकस्मिथला बोलावले, त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांना आतमध्ये किमान पाच लोक सापडले. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, घरातील रहिवाशांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना मुलचंदानी तेथे नसल्याची माहिती दिली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली त्यांचे जबाब नोंदवले गेले.
मुलचंदानी खोलीत लपून असल्याचे आढळले: सुमारे सहा तासांच्या शोधानंतर ईडीच्या अधिकार्यांना कुलूप असलेल्या आवारात एक नोकरांची खोली सापडली. अधिकाऱ्यांनी त्या खोलीची चावी मागितली असता, त्यांना चावी देण्यास घरातील व्यक्तींनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकस्मिथला पुन्हा बोलावण्यात आले होते. दरवाजाचे कुलूप तुटल्यानंतर एजन्सीला मुलचंदानी या खोलीत लपून असल्याचे आढळले. पिंपरी चिंचवडमध्ये ईडीने छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी ईडी कसून तपासणी करत आहे.
चॅट आणि क्लाउड डेटा मिटवल्याचा संशय: ईडीने शोध दरम्यान असहकार्य केल्याचा आणि पुरावे लपविण्याचा व नष्ट केल्याचा आरोप करणाऱ्या सहाही लोकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन महिलांसह या सर्वांना स्थानिक पोलीसांनी अटक केली, असे ते म्हणाले. बँकेच्या माजी अध्यक्षाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमधील चॅट आणि क्लाउड डेटा मिटवल्याचा संशय एजन्सीला आहे. या धाडीत सुमारे २.७३ कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे आणि ४० लाख रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरबीआयने ऑक्टोबर 2022 मध्ये बँकेचा परवाना रद्द केला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाही, असे आरबीआयने म्हटले होते. बँकेत अनेक महिन्यांपासून घोटाळा होत असल्याचे बोलले जात होते.