मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवरील (पीएमसी) निर्बंधांचा फटका सामान्य ग्राहकांप्रमाणेच कंपन्यांनाही बसला आहे. बँकेच्या संतप्त खातेधारकांनी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या फोर्ड कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
खातेधारकांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही, याबाबत अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला. बँक बुडल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, डीलरची देणी रखडल्याने व्यवसायाला घरघर लागली आहे. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे, रिझर्व्ह बँकेच्या हलगर्जीपणामुळे आमच्या आयुष्याची कमाई गेल्याची भावना आंदोलक शैली नाबर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा
दरम्यान, पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणूक करणे, कट रचणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.