मुंबई : पंतप्रधान मोदींच्या आजच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात 4,500 पोलीस तैनात करणार आहेत. सीआपीएफच्या 4 तुकड्या, दंगल विरोधी पथक आणि जलद कृती दलाची प्रत्येकी 1 तुकडी देखील तैनात केली गेली आहे. दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत, पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी असणार आहे.
सुरक्षेचे पाऊल म्हणून पोलीस तैनात : बीकेसी पोलीस ठाणे, अंधेरी पोलीस ठाणे, जोगेश्वरी पोलीस ठाणे आणि मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईटर, एअरक्राफ्ट मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. वाहतूकुीच्या नियोजनात बदल पंतप्रधान मोदींच्या उद्या शहर दौऱ्यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूकुीच्या नियोजनात बदल केला आहे. दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत, पश्चिम उपनगरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी असणार आहे. एसआरपीएफच्या 4 तुकड्या, दंगल विरोधी पथक आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची प्रत्येकी 1 तुकडी तैनात केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
असा असेल कार्यक्रम : पंतप्रधान दौऱ्यात पहिल्यांदा एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण हा कार्यक्रम असणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या २० हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे उद्घाटन यावेळी करण्यात येईल. त्यासोबतच मुंबईतील ३ मोठ्या हॉस्पिटलचा भूमीपूजन सोहळाही पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडेल. शिवाय मुंबईतील महत्वकांशी असा प्रकल्प असलेल्या ४०० किमीच्या सीसी रोडच्या कामाचेही उद्घाटन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडणार आहे. शिवाय मुंबईतील फेरीवाल्यांसाठीच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत १० हजारांच्या धनादेशाचे वाटपही यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांची जाहीर सभा : पंतप्रधान वांद्रे येथील बीकेसी मैदानावर एक भव्य सभा घेणार आहेत. या भव्य सभेची जय्यत तयारी शिंदे फडवणीस सरकारकडून करण्यात आलेली आहे. जवळपास एक लाख नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेत सामील होतील अशी आसन व्यवस्था या सभेसाठी करण्यात आलेली आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा मंच तयार करण्यात आलेला आहे. केवळ ज्या मान्यवरांना स्टेजवर निमंत्रण असणार आहे. त्यांनाच स्टेजवर घेतले जाणार आहे. तर आमदार खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांसाठी स्टेजच्यासमोर आसनव्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यामागे सामान्य नागरिक बसतील अशी व्यवस्था या सभेसाठी करण्यात आलेली आहे. या सभेसाठी केल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
वाहतूक व्यवस्थेत बदल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने आज मुंबईतील काही महत्त्वाच्या रस्त्यांची वाहतूक बदलण्यात आलेली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने वळवण्यात आली आहेत. एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शन तसचे कुर्ल्याकडे वळवण्यात आली आहेत. तर काहीशी वाहतूक पूर्व दृतगती मार्गाकडे वळवण्यात येणार आहेत. सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ केली जाणार आहेत. तर पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे मार्गस्थ होतील.
४.३० वाजता पंतप्रधानांचे आगमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायंकाळी साडेचार वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. मुंबई विमानतळावरून पंतप्रधान थेट बीकेसी येथे होणाऱ्या सभास्थानी पोहोचतील. मुंबईतील सार्वजनिक कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान जनतेला संबोधित करतील. जवळपास साडेसहाच्या दरम्यान नव्या मेट्रोमार्गिकेचे उद्घाटन करणार आहेत.