मुंबई : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पोलीस भरती (Police Recruitment) जाहीर केली होती. तशी जाहिरातही राज्यातील प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, काही कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, आता पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून उमेदवारांच्या शारिरीक आणि मैदानी चाचणीला सुरूवात (Physical Test started for the Constable post) करण्यात आली आहे.
18 लाख ऑनलाईन अर्ज : महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या (Police Recruitment) प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.
या तारखेला शारीरिक चाचणी - 2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर, 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हिंगोली जिल्हा - जिल्ह्यात 21 जागांसाठी पोलीस भरती आज सकाळपासूनच पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी कडाक्याच्या थंडीमध्ये उमेदवारांनी सकाळपासूनच रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी यासह शारीरिक सर्व तपासण्या केल्यानंतर उमेदवाराला पुढील भरती प्रक्रियेसाठी तयार केले जात आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दलामध्ये 21 जागांसाठी 1435 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज केले आहेत. 2 जानेवारी ते 4 जानेवारी या काळात ही पोलीस भरती प्रक्रिया होत आहे.
परभणी जिल्हा - अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण 75 पोलीस शिपाई जागांसाठी 4900 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. यासाठी आज सकाळपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात झाली आहे. भावी पोलीस होण्यासाठी हजारो उमेदवार सज्ज झाले आहेत.
नाशिक जिल्हा - ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत चालकांची 15 तर पोलीस शिपायांची 164 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे एकूण 21 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सुरवातीचे दोन दिवस चालकांसाठी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. ग्रामीण पोलिसांनी मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण पोलिसांकडे 15 चालक पदांसाठी 2 हजार 114 एकूण उमेदवारांनी अर्ज केले असून, यामध्ये 2043 पुरूष उमेदवार तर 71 महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर, 164 पोलीस शिपाई पदांसाठी एकूण 21 हजार 49 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 13 हजार 859 पुरुष उमेदवार तर 5073 महिला उमेदवारांसह 03 तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
अमरावती जिल्हा - शहर व ग्रामीण पोलीस दलात शिपाई व चालक शिपाई म्हणून जागा पटकावण्यासाठी आरंभलेली बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रिया २ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ग्रामीण पोलीस दलातील १९७ आणि शहरातील ४१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी १५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. २ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता पासून येथील पोलीस मुख्यालयस्थित कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्हा - हिंगोली जिल्ह्यातही आज पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. संत नामदेव कवायत मैदानात सुरू असलेल्या या भरतीला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु, जिल्ह्यासाठी जागा कमी असून या जागा वाढवण्यात याव्यात अशी मागणी जिल्ह्यातील तरुणांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात 440 उमेदवारांनी पोलीस भरतीची आज चचणी दिली.
धुळे जिल्हा - धुळे जिल्ह्यात देखील आज या भरती प्रक्रियेला सुरूवाद झाली. 7 ते 8 अंशाच्या तापमानात उमेदवारांची खरी परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 42 जागांसाठी तब्बल 3800 हून अधिक अर्ज आले आहेत. धुळ्यात आज 800 उमेदवारांनी ही चाचणी दिली.
अकोला - जिल्ह्यामध्ये 366 जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पोलीस भरती करिता सुमारे 4 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू असताना वसंत देसाई क्रीडांगणावर पोलिसांनी चारही बाजूंनी मोठमोठे पडदे लावले आहे. जेणेकरून आतमध्ये सुरू असलेली उमेदवारांची मैदानी खेळ कोणालाही दिसू नये, अशी व्यवस्था केली आहे.
भंडारा जिल्हा - भंडारा जिल्ह्यात 117 पदांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. आज पहाटेपासून उमेदवारांनी मैदानात प्रचंड गर्दी झाली होती. भंडारा पोलिस मुख्यालयात 9 दिवस भरती प्रक्रिया चालणार आहे.
यवतमाळ जिल्हा - जिल्ह्यातील 302 जागांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. 302 जागांसाठी 26 हजार 385 अर्ज आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा - रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियमवर पोलिस भरतीची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. 131 जागांसाठी 7 हजारांहून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
वाशिम जिल्हा - वाशिम जिल्ह्यात 14 जागांसाठी 1078 अर्ज दाखल झाले असून यातील 200 उमेदवारांची आज चाचणी झाली.
अशी असेल शारीरिक चाचणी - पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
ही कागदपत्रे सोबत आवश्यक
- उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती
- आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,
- सर्व मूळ कागदपत्रे
- सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
- अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)
- आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र