मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवर नेमणूक करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाकडून आलेल्या शिफारशीवर अद्यापही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांनी मंत्रिमंडळाकडून करण्यात आलेल्या शिफारशीवर निर्णय घेत उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर निवड करण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरींदर अरोरा यांनी दाखल केली आहे.
केवळ राजकीय स्वार्थापोटी भाजपकडून अशाप्रकारचे कट-कारस्थान रचले जात असून भाजपच्या स्वार्थासाठी भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई केल्याचा दावा, या याचिकेत करण्यात आला आहे. सध्या उद्धव ठाकरे हे विधीमंडळाचे सदस्य नसून त्यांची नियुक्ती विधानपरिषदेवर 28 मे अगोदर करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 5 मेपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे.