मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असताना पावसाळी आजारांपासून मुंबईकरांचे संरक्षण करता यावे, म्हणून पालिकेचा पेस्ट कंट्रोल विभाग सतत कार्यरत आहे. या विभागातील ५५ कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही या विभागातील कर्मचाऱ्यांनी मुंबईत डेंग्यूच्या २५९८७ ठिकाणी तर मलेरियाची १०६३५ ठिकाणी शोधून नष्ट केली आहेत. तसेच ४९९६ नोटीस बजावण्यात आल्या असून ३ लाख ७६ हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती या विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान पावसाळी आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. या आजारांचा प्रसार रोखता यावा म्हणून पालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागाकडून धूर फवारणी केली दाते. डेंग्यू आणि मलेरियाचे डास आढळून येतात अशा ठिकाणी कार्यवाही करत त्या आळ्या नष्ट केल्या जातात. तसेच ज्या ठिकाणी या आळ्या आढळून येतात त्यांना पालिकेकडून नोटीस बजावून कायदेशीर कारवाई तसेच दंड वसूल केला जातो.
यावर्षी मुंबईत १ जानेवारी ते २८ जुलै या कालावधीत मलेरियाच्या आळ्या शोधण्यासाठी २४२०९३ इतक्या पाण्याच्या जागा तपासल्या त्यात १०६३५ ठिकाणी मलेरियाच्या आळ्या सापडल्या. तर डेंग्यूच्या आळ्या शोधण्यासाठी ६५९६६७९ पाण्याच्या जागा तपासल्या. त्यात २५९८७ ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या. मलेरिया आणि डेंग्यूच्या आळ्या सापडलेल्या जागी कार्यवाही करत आळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत डेंग्यू मलेरियाच्या आळ्या ज्या ठिकाणी सापडल्या अशा ४९९६ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. १५६ प्रकरणे कोर्टात दाखल करण्यात आली आहेत.
आतापर्यंत ३ लाख ७६ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नारिंग्रेकर यांनी दिली. कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून पेस्ट कंट्रोलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केले. यात या विभागाचे ५५ अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात माझ्यासह उप पेस्ट कंट्रोल अधिकारी, पेस्ट कंट्रोल अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारीही पॉझिटिव्ह आले होते. या विभागातील आतापर्यंत ३ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.
मलेरियाचे रुग्ण अधिक -
पावसाळा सुरू होताच शहरात हिवताप, मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनासह आता मुंबईकरांना साथीच्या आजारांनाही तोंड द्यावे लागत आहे. जून महिन्यात शहरात ३०० मलेरियाचे, चार डेंग्यू आणि एक लेप्टोस्पायरोसिसचा रुग्ण आढळून आले. मे महिन्यामध्ये १६३ मलेरियाचे रुग्ण आढळले होते, तर एक लेप्टो आणि सहा डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. २०१९ च्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात मलेरिया रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे नोंदले गेले. मात्र, जूनमध्ये मे महिन्याच्या तुलनेत पुन्हा रुग्णसंख्येमध्ये दुपटीने वाढ झाली. २०१९ ला याच काळात मलेरियाचे ३१३ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षांच्या तुलनेत डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्ण कमी प्रमाणात आढळल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
साथीच्या आजारांची रुग्णसंख्या
महिना - हिवताप - डेंग्यू - लेप्टो
- मे २०१९ - २८४ - ६ - १
- मे २०२० - १६३ - ३ - १
- जून २०१९ - ३१३ - ८ - ५
- जून २०२० - ३२८ - ४ - १