मुंबई - लॉकडाऊन काळात देशभरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना स्वगृही परतण्याकरता भारतीय रेल्वेने विशेष श्रमिक रेल्वेची सोय करून दिली. मात्र, प्रवासादरम्यान, परतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवू लागली आहे. त्यामुळे, ज्या नागरिकांची प्रकृती आधिच खालावलेली आहे. किंवा रोगप्रतिकारशक्तीची कमतरता असलेल्या नागरिकांनी सहसा प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे विभागामार्फत करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार, मजूर आपापल्या घरी परत जावेत या उद्देशाने भारतीय रेल्वे दररोज विशेष श्रमिक गाड्या देशभरात चालवल्या जात आहेत. मात्र, या सेवेचा लाभ घेत असलेल्या आणि ज्यांची वैद्यकीय, शारीरिक स्थिती आधीपासूनच बिघडलेली आहे, त्यांना कोरोना आजाराचा अजून धोका वाढण्याची शक्यता असल्याचे लक्षात आले आहे. आधीपासूनच विविध आजार असलेल्या लोकांच्या मृत्यूच्या काही दुर्दैवी घटना प्रवासादरम्यान घडल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाच्या 17 मे च्या आदेशानुसार, रेल्वे मंत्रालयाने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग, रोगप्रतिकारशक्ती कमतरता असलेले(मोर्बिडीटीज), गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रेल्वेचा प्रवास शक्यतो टाळावा, असे आवाहन केले आहे.
देशातील काही नागरिक यावेळी रेल्वे प्रवास करू इच्छितात. त्यांना रेल्वे सेवा मिळावी यासाठी भारतीय रेल्वे दिवसातील 24 तास सतत कार्यरत आहे. प्रवाशी सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कुठल्याही कठीण प्रसंगी, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे परिवाराशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक १३९ आणि १३८ वर संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केले आहे.