मुंबई - कोरोना विषाणूने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचे थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचे समोर येत आहे. या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे निजामुद्दीन कनेक्शन असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांचा संशय आहे की, यातील काही जण चेन्नई तर काही जण केरळला गेले असून त्या राज्यातील प्रशासनसोबत संपर्क साधून त्यांची माहिती दिली व घेतली जात आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन मरकझ येथे सामील झालेले 10 जण तब्बल 6 दिवस धारावीत राहत होते. या दरम्यान हे 4 वेगवेगळ्या ठिकाणी थांबले होते. धारावी परिसरात ज्या-ज्या ठिकाणी मरकझचे लोक गेले होते, त्यांची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. धारावीतील ज्या 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो व्यक्ती 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत या तबलिगी नागरिकांच्या संपर्कात होता.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तबलिगीच्या काही सदस्यांनी 20 ते 24 मार्च या दरम्यान दिल्ली ते मुंबई व चेन्नई असा विमान प्रवास केला होता. दरम्यान, ज्या विमानातून या संबंधित प्रवाशांसोबत इतरांनी प्रवास केला आहे. ज्या टर्मिनलमधून हे लोक बाहेर पडले होते. त्या प्रवाशी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाशी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.