मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल रोजी प्रचंड उत्साहात साजरी होते. यावर्षी मात्र देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे हा उत्सव आपल्या घरात बसून साजरा करा, असे आवाहन सरकार व सर्वच नेतेमंडळी करत आहेत. ही संकटाची घडी आहे. बाबासाहेबांनी नेहमी देशच श्रेष्ठ मानला आणि इथल्या तमाम आंबेडकरी जनतेने हजारो वर्षे कष्ट करून हा देश उभा केला आहे. त्यामुळे विनाकारण महाराष्ट्रात एकाही ठिकाणी गर्दी होऊ नये. संचारबंदीचा नियम मोडून कोणालाही कोरोनाचा फटका बसू नये. त्यामुळे यंदा सर्वत्र बाबासाहेब आंबेडकर जयंती ऑनलाईन होत आहे. लॉकडाऊनमुळे यंदाची भीमजयंती घरातूनच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर उत्सवाला सुरुवात -
लॉकडाऊनमुळे यंदाची भीमजयंती घरातूनच साजरी होण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. सोशल मीडियावर ११ एप्रिलपासूनच जयंतीला सुरुवात झाली आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. बाबासाहेबांवर कविता, लेख लिहून शेअर केले जात आहेत. अशाप्रकारे यंदाची जयंती ऑनलाईन साजरी होत आहे.
दररोज जयंतीनिमित्त गाण्यांचे कार्यक्रम, व्याख्यान, कोरोना प्रबोधन तसेच इतर कार्यक्रम सर्व आंबेडकर अनुयायी संघटनांच्या तसेच पक्षांच्या आणि माध्यमांच्या पेजवरून होत आहे. यामध्ये प्रबुद्ध भारत, सारं काही समष्ठीसाठी, मूकनायक आणि इतर सर्व भीम अनुयायी संस्था आणि संघटनांचा समावेश यात आहे. आजपासूनच बाबासाहेबांविषयी Google विविध प्रकारची माहिती सर्च करा. या काळात बाबासाहेब हे गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले व्यक्ती ठरतील आणि होऊ शकते. गुगल बाबासाहेबांचे डूडल ठेवील आणि आपले सुद्धा ज्ञान वाढेल.
14 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता सगळ्यांनी आपल्या घरातच स्नान करून, शुभ्र वस्त्र परिधान करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करू. आपल्या अंगणात असतील तीच फुले वापरा. पुष्पहार आणायला बाहेर पडू नका. रस्त्यावर गर्दी करू नका. 9.15 मी सगळ्यांनी एकदाच वंदना ग्रहण करावी. विहार, पुतळा, झेंडा अगदी कितीही हाकेच्या अंतरावर जरी असला तरी तिथे जमू नका. गर्दी करू नका. या निमित्ताने भोजन तयार करून गरिबांना वाटण्याचा कोणताही कार्यक्रम ठेवू नका. त्यामुळे गर्दी होऊन नियमांची पायमल्ली होईल. आपल्यावर नेहमी आरोप होतो की, हे सरकारचे जावई आहेत, सबसिडी खाणारे आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसै जमा करा -
भीम जयंतीची वर्गणी मुख्यमंत्री फंडात ऑनलाईन जमा करा आणि ती पावती सोशल मीडियावर शेअर करा. दाखवून द्या की आम्ही घेणारे नाही देणारे आहोत. या देशाला आपण आपल्या श्रमाने उभे केले आहे. 14 एप्रिलला 11 वाजेपर्यंत सगळी कामे आटोपून 11 ते 7 असा किमान 8 तास आपल्या मुलांना बाबासाहेब 18 तास कसे अभ्यास करायचे हा अनुभव देण्यासाठी त्यांच्याकडून अध्ययन करून घ्या. आपण स्वतः सुद्धा बाबासाहेबांचे एखादे पुस्तक वाचून काढा. असा एकही आंबेडकरी माणूस सापडणार नाही की ज्याच्या घरात बाबासाहेबांचे पुस्तक नाही.
7.30 ते 8.30 या एका तासाचा कालावधीत घरात ज्यांना गाण्यांचे अंग आहे त्यांनी बाबासाहेबांचे एक तरी गीत गावून अभिवादन करावे. एखादे सुंदर झालेले गाणे सोशल मीडियावर रेकॉर्ड करून शेअर करा. लहान मुलांची बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर छोटी भाषणे आतापासूनच तयार करून घ्या आणि 14 एप्रिलला या वरील वेळात ती म्हणवून घ्या. काही चांगल्या भाषणांचे रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर शेअर करा.
जयंती ऑनलाईन साजरी होत असलेले पेज -
https://www.facebook.com/PrabuddhaBharatNews/
https://m.facebook.com/story.php?story_fbid=224202695309255&id=131487166905641
www.samashti.com