मुंबई - पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या शिवडी रेल्वे फाटकात रेल्वे पटरी आणि रस्ता यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. हे खड्डे बाप्पाच्या आगमनापूर्वी दूर करावेत, अशी मागणी शिवडीतील जय मल्हार सेवा संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढेरंगे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
गणेश उत्सवानिमित्त शिवडी परिसरातील लोकवस्तीत सार्वजनिक आणि घरगुती अशा साधारण पाच हजारहून अधिक गणपतींचे आगमन होते. तर शिवडी पूर्वभागातील घासलेट बंदरात गणेशाचे विसर्जन करण्यात येते. गणेशाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत येथील नागरिकांना शिवडी फाटक या एकमेव मार्गाचा अवलंब करावा लागतो. यंदा गणेश भक्तांना या खड्ड्यांतून प्रवास करणे गैरसोयीचे होणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा या दृष्टीने हे खड्डे गणेशाच्या आगमनापूर्वी बुजवावे तशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले जाईल असे आश्वासन दिले आहे.