मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीची लाइफलाइन असलेल्या लोकलधून प्रवास करण्यास बंदी असल्याने मुंबईकर बेस्टने प्रवास करत आहेत. मात्र, बेस्टच्या बसमध्ये चढताना प्रवाशांना एक मार्ग सांगितला जातो, मात्र बस जाते दुसऱ्याच मार्गावरून, असे प्रकार होऊ लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्चपासून लॉकडाऊन आहे. यादरम्यान सर्व व्यवहार बंद होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या बसने प्रवास करण्याची मुभा होती. सध्या या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. तर, सामान्य प्रवाशांना ८ जूनपासून बेस्टने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या सर्कतेमुळे अट्टल चोर जेरबंद
बेस्ट हे एकमेव प्रवासासाठी साधन असल्याने मुंबईकर प्रवासी तासंतास रांगेत उभे राहून बसने प्रवास करत आहेत. मुंबई महापालिका मुख्यालयाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विक्रोळी येथे जाणाऱ्या ७ आणि गोवंडी शिवाजी नगर येथे जाणाऱ्या ८ नंबर बससाठी अशीच लांब रांग लागते. याठिकाणी बेस्टचे अधिकारी प्रवाशांना घाटकोपर, चेंबूर येथे जाण्यासाठी ८ नंबर मधून प्रवास करण्यासाठी सांगतात. मात्र नंतर ही बस पुढे चेंबूर मार्गे गोवंडीला नेली जाते यामुळे प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरावे लागत आहे. मधेच उतरल्यानंतर पुन्हा दुसरी बस मिळत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे घाटकोपर ते ताडदेव असा प्रवास करणारी ३८५ ही बस घाटकोपर डेपो, पूर्व द्रुतगती मार्ग, घाटकोपर स्टेशन, अमर महालमार्गे ताडदेवला जात आहे. यामुळे ही बस पूर्ण घाटकोपरला वळसा मारून जात असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. याची दखल बेस्ट प्रशासनाने घेऊन प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हेही वाचा - शासकीय धान्य गोदामावर चोरट्यांचा डल्ला , 1850 रुपयांचे धान्य लंपास