मुंबई - रेल्वेसेवा बंद असल्याने मुंबईकर प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेस्टचा वापर केला जात आहे. बेस्टमध्ये प्रवास करताना प्रवाशांसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. हे नियम पाळण्याचे आवाहन बेस्ट कर्मचारी करत असले तरी प्रवासी मात्र या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसत आहे.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मुंबईसह देशभरात लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनच्या काळात बेस्टमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक केली जात होती. त्यावेळी बेस्टमधून अत्यावश्यक सेवा देणारे २ लाख ५० कर्मचारी प्रवास करत होते. मिशन बिगीन अगेन अंतर्गत ८ जूनपासून अत्यावश्यक सेवेबरोबर इतर सामान्य प्रवाशांनाही प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे आता बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून ती १६ लाखांवर पोहचली आहे.
बेस्टमधील प्रवाशांची संख्या वाढली असल्याने बेस्टने एका सीटवर एक प्रवासी व पाच उभे प्रवासी हा नियम रद्द करून पुन्हा पहिल्याप्रमाणे एका सीटवर दोन प्रवासी बसतील असा नियम करावा, अशा मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. गर्दीच्या वेळी एका सीटवर दोन प्रवासी बसू शकतात. मात्र, गर्दी नसताना तरी प्रवाशांनी हा नियम पाळावा अशी, अपेक्षा बेस्ट प्रशासनाची आहे. मात्र, गर्दी नसतानाही प्रवासी हा नियम पायदळी तुटवत आहेत.
मास्क लावण्यास सांगितल्याने वाहकाला (कंडक्टर) मारहाण -
बेस्ट वाहक खरपडे हे बस क्रमांक ७०६ (मारोळ आगार ते भाईंदर स्टेशन) भाईंदर रेल्वे स्टेशनवरून मारोळकडे बस घेऊन निघाले होते. बस घोडपदेव थांब्यावर आली असता एक प्रवासी तोंडाला मास्क न लावता बसमध्ये चढला. बसवाहकाने त्या प्रवाश्याला तोंडाला मास्क लावण्याची विनंती केली. 'मला कोरोना झाला नाही,' असे सांगून तो प्रवासी शांत बसला. मात्र, जेव्हा उतरण्याचा थांबा आला तेव्हा त्याने वाहक खरपडे यांना मारहाणकरून पळून गेला. या घटनेची तक्रार बसवाहकाने जवळच्याच समता नगर पोलीस ठाण्यात केली. मारहाणीच्या घटनांमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.
बेस्टमध्ये प्रवास करतानाचे नियम -
बेस्टमधून प्रवास करताना मास्क वापरावे, बसमधील एका सीटवर एकाच प्रवाशाने बसावे, उभ्याने पाचच प्रवाशांनी प्रवास करावा, असे नियम आहेत. मात्र, गर्दीच्या वेळी म्हणजेच कामावर जाण्याच्या आणि कामावरून घरी जाण्याच्या वेळेस हे नियम पाळले जात नाहीत. गर्दी नसताना हे नियम पाळावेत, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. मात्र प्रवासी या नियमांना पायदळी तुडवत आहेत.