जळगाव - पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर वसलेल्या जळगाव शहरातून मुंबई आणि पुणे शहरात जाण्यासाठी खास रेल्वेगाडी नाही. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून किंवा खासगी ट्रॅव्हल्सला जास्तीचे भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जळगावहून मुंबई-पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सुरू कराव्यात, अशी मागणी प्हेरवासी करत आहेत.
जळगाव शहरातून शिक्षण आणि रोजगोरोसाठी हजारो तरुणांचा ओढा मुंबई, पुण्यासारख्या महानगरांकडे आहे. याशिवाय दाल मिल, प्लास्टिक व चटई उद्योग जळगावात मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील व्यापारी वर्गाचा मुंबई आणि पुण्याशी सतत संपर्क असतो. दररोज जळगावहून मुंबई तसेच पुण्याला खासगी ट्रॅव्हल्सने हजारो लोक जातात. मात्र, यासाठी लोकांना अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागते. जळगाववरून मुंबई, पुण्याला जाण्यासाठी खास रेल्वे नाही. जळगाववरून ज्या रेल्वे जातात, त्या आधीच प्रवाशांनी भरलेल्या असतात. त्यामुळे जळगाववरून आरक्षण मिळत नाही. ही गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जळगाव येथून मुंबई, पुण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी होत आहे.
आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे सण येणार आहेत. या काळात जळगावहून मुंबई, पुणे येथे जाणारे तसेच मुंबई, पुण्याहून जळगावात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. ही संधी साधून खासगी ट्रॅव्हल्स कंपनी चालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारून लूट करतात. अवाजवी भाडे देऊन गावी येणे विद्यार्थ्यांना शक्य नसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जळगावहून मुंबई, पुण्यासाठी कायमस्वरूपी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण शाखेच्या वतीनेही करण्यात आली आहे. हजारो लोकांशी निगडीत असलेल्या प्रश्नाबाबत शिवसेनेने रेल्वेच्या डीआरएम यांना निवेदन देखील दिले आहे.
जळगाव येथून मनमाडमार्गे मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केली तर पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यातील जनतेला देखील गैरसोय दूर होणार आहे. हजारो लोकांच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत असलेली ही मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.