मुंबई- पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान, पार्थ पवार हे नाराज नाहीत, मात्र त्यांच्या संदर्भात पक्ष सोडणार असल्याची चर्चा असली तरी तसा काही प्रकार होणार नाही. मुळातच पार्थ पवार हे नाराज नाहीत, त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मुंबईत केला.
पार्थ पवार हे लवकरच वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात, अशा स्वरुपाच्या चर्चांना सध्या उधाण आले असून त्यावर जयंत पाटील यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले की, कुटुंबातील गोष्ट बाहेर आणून अनेक प्रकारच्या त्यावर चर्चा माध्यमात केल्या जात आहेत. वडीलधाऱ्या माणसाने काही बोलले तर कोणी राग करत नाही. पण त्यापलीकडे काहीच नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पार्थ पवार नाराज असल्याचे कुठेही वातावरण नाही. मात्र, चर्चा तशा रंगवल्या जात असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यात भाजपकडून 'मिशन लोटस' चालवले जाईल का? या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, भाजपचे ते स्वप्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असून हे सरकार चालवण्यासाठी तिन्ही पक्ष एकसंघ आहेत. यात काही शंका नाही. आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा भाजपमधील अनेक आमदारांना विश्वास वाटतो. त्यामुळेच त्यांच्यातील अनेक आमदार आणि नेत्यांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. भाजपमध्ये गेलेले परंतु जे आमदार होऊ शकले नाहीत, अशा लोकांबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
आज मंत्रालयात राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भेट घेतली. ही भेटी काही कामांसाठी व राज्यातील महिलांच्या विविध प्रश्नांसाठी झाली होती. त्यात केवळ राज्यातील हिताचेच विषय होते, असा खुलासाही पाटील यांनी केला. काल सिल्वर ओक येथे झालेल्या बैठकी संदर्भात ते म्हणाले की, जी बैठक झाली ती पक्ष वाढीसाठी होती. त्यावरच चर्चा झाली, अशी माहितीही त्यांनी दिली.
शरद पवार यांना भेटण्यासाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर
दरम्यान, पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मगाणी केली होती. त्याबाबत शरद पवार यांनी पार्थ पवार यांना 'इम्याच्युर' म्हटले होते. यानंतर काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली होती. मात्र, त्यात अजित पवार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यानंतर आज पार्थ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहे.
हेही वाचा- 'अन्य पक्षातील आमदार फुटतील चिंता करू नका; स्वतःचा पक्ष आणि सरकार वाचवण्याची भूमिका घ्या'