मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या युसूफ मंजिल इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात ६ ते ७ जण अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे.
ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते. त्यांनाही बाहेर काढल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत एकूण १७ जणांना बाहेर काढल्याची माहिती अग्निशमाक दलाने दिली आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथील मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयासमोर लोहार चाळ आहे. याठिकाणी म्हाडाची उपकरप्राप्त युसूफ मंजिल ही तीन मजली इमारत आहे. इमारत जुनी असल्याने या इमारतीमध्ये काही लोक राहत होते. रात्री ९ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास या इमारतीच्या मागील बाजूचा काही भाग कोसळला. इमारतीचा भाग बाजूला लागून असलेल्या द्वारकादास या इमारतीच्या प्रवेशद्वारावर कोसळला. यामुळे ढिगाऱ्याखाली काही रहिवासी अडकले. अडकलेल्या ६ ते ७ रहिवाशांना येथील स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढल्याचे शमशाद खान यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशामक दल, पालिका कर्मचारी दाखल झाले असून, ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहेत का याचा शोध घेतला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधकार्यादरम्यान एकूण १७ जणांना बाहेर काढले. त्यापैकी १३ जणांना तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून, २ जणांना दुसऱ्या मजल्यावरून तर एका ८० वर्षीय महिलेला बाहेर काढल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.
म्हाडाची नोटीस -
युसूफ मंजिल इमारत धोकादायक असल्याने म्हाडाकडून इमारत खाली करण्याची नोटीस बजवण्यात आली. त्यानुसार, अनेक रहिवाशी इतर ठिकाणी राहण्यास गेले आहेत. मात्र, त्यानंतरही काही रहिवाशी आद्यप या इमारतीमध्ये राहत होते. इमारत कोसळली त्यावेळी यापैकी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाच्या जवनांनी सुखरुप बाहेर काढले.