मुंबई - राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली ही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी या याचिकेमध्ये केलेला आहे. तसेच याचिकेमध्ये सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तब्बल 130 पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिलेला आहे.
परमबीर सिंग यांचा दावा -
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरी सुविधा कक्षाचे अधिकारी संजय पाटील आणि मुंबई गुन्हे शाखेचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या दोघांना त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. तसेच महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करावी, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी केला. तसेच माझे आरोप खोटे असतील तर देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, असेही त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. सचिन वाझे आणि संजय पाटील यांना कधी-कधी गृहमंत्र्यांनी बोलावले होते, याबद्दल हेच अधिकारी सांगू शकतात, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - "निलंबनाची मागणी करणाऱ्यांचेच परमबीर हे आज 'डार्लिंग' झालेत"
गृह खात्यात सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल मी प्रत्यक्ष जाऊन तोंडी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असते, तर त्या संदर्भातील पुरावा राहिला नसता, असा दावाही परमबीर सिंग यांनी केला आहे. लेखी पुरावा म्हणून मी पत्र लिहिले आहे. मेल केलेला होता. मात्र, त्यावर सही केली नव्हती, असेही सिंग यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या समोर चौकशीला हजर होण्यापूर्वी सचिन वाझे यांनी जगाला गुडबाय करावा, असे वाटत असल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यावेळेस परमबीर सिंग यांनी सचिन वाझे यांना बोलावून समजवण्याचा प्रयत्न केला होता, असेही समोर येत आहे.
या याचिकेच्या माध्यमातून परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात विनंती केलेली आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या त्यांच्या बदलीसंदर्भात न्यायालयाने योग्य ती दखल घ्यावी. तसेच गृहमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात निष्पक्ष सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक