मुंबई - खंडणी वसुली प्रकरणात फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh Extortion Case) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त (Parambir Singh Property) करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरोधात ही कारवाई करण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांची कोट्यवधीची संपत्ती असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यातील काही संपत्तीची कागदपत्रेही क्राईम ब्रँचला मिळाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी परमबीर यांना फरार घोषित केले आहे. फरार घोषित झाल्यापासून 30 दिवसांपर्यंत जर परमबीर पोलिसांना शरण आले नाही तर त्यांच्या संपत्तीवर जप्त येण्याची शक्यता आहे. (Mumbai Crime Branch over Param Beer Singh)
जुहूत पाच कोटींचा फ्लॅट -
परमबीर सिंह यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मुंबईतील जुहू परिसरात आयपीएस अधिकाऱ्यांच्या वसुंधरा सोसायटीत त्यांचा 2500 स्क्वेअर फुटांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत पाच कोटींच्या घरात आहे. हा फ्लॅट गेल्या काही वर्षांपासून भाड्याने देण्यात आलेला आहे. या घराच्या भाड्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होते आहे.
नेरुळमध्ये एक फ्लॅट आणि पाच मालमत्ता -
नवी मुंबईतील नेरुळ परिसरात परमबीर यांचा एक फ्लॅट आणि उतर पाच मालमत्ता असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली आहे. नेरुळच्या फ्लॅटची किंमत चार कोटींच्या घरात असून हाही भाड्याने देण्यात आलेला आहे. यातूनही त्यांना लाखो रुपये मिळत आहेत.
फरीदाबादमध्ये दोन मालमत्ता -
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये दोन मालमत्ता आहेत. यात 400 स्क्वेअर फूटांचा रिकामा प्लॉट आहे. चंदीगडमध्येही त्यांची पिढीजात मालमत्ता असल्याची माहितीही मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. या मालमत्तेत त्यांच्या दोन भावांचाही हिस्सा आहे.
बेनामी मालमत्ता असल्याचाही संशय -
परमबीर सिंह यांच्याकडे या मालमत्तांव्यतिरिक्त अजून बेनामी मालमत्ता असल्याचा पोलिसांना संशय आहे. अशा मालमत्तांचाही पोलीस शोध घेत आहेत. जर परमबीर 30 दिवसापर्यंत पोलिसांसमोर हजर झाले नाहीत तर त्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त होणार आहे.
मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये 22 जुलै रोजी परमबीर आणि पाच पोलिसांविरोधात तसेच दोन इतर व्यक्तिंविरोधात एका बिल्डरकडून 15 कोटींची खंडणी मागण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशीही क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आली आहे.