मुंबई - २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानने अटक केली आहे. या घटनेवरुन शिवसेनेने मुखपत्र सामनातून पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला आहे. हाफिजला अटक करण्याचे पाकिस्तानने नाटक केल्याचे सेनेने म्हटले आहे. आत्तापर्यंत असे नाटकाचे दोन वेळा यशस्वी 'प्रयोग' झाले असून, हा तिसरा प्रयोग आहे. ही निव्वळ धुळफेक असल्याचे सेनेने म्हटले आहे.
चिनी माकडांचे मांजर आडवे
गेल्या अनेक वर्षापासून हाफिज सईदसंदर्भात जागतिक पातळीवरून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. हाफिजला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, यासाठीही प्रचंड प्रयत्न केले होते. अमेरिका, इंग्लंडसह सर्व बड्या देशांनीही त्याला समर्थन दिले होते. मात्र, नेहमीप्रमाणे चिनी माकडांचेच मांजर आडवे गेले होते. अखेर चीननेही विरोध सोडून दिल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले. मात्र, पाकिस्तानने हाफिजवर अशा कारवाया करण्याचे नाटक यापूर्वी अनेकदा केल्याचे सेनेने म्हटले आहे.
हाफिजचा बोलविता धनी आयएसआय
हाफिजचा बोलवता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो, त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य असल्याचे सेनेने म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही पाकच्या पंतप्रधानाने हाफिजवर कडक कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत केलेले नाही. तेव्हा विद्यमान पंतप्रधान इम्रान ते दाखवून आधीच गोत्यात असलेला आपला पाय आणखी खोलात घालतील याची शक्यता नसल्याचे सेनेने म्हटले आहे.
दहशतवादाचा पोशिंदा हिच पाकिस्तानचा प्रतिमा
आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान सध्या देशोदेशी कटोरा पसरून भीक मागत फिरत आहे. दहशतवादाचा पोशिंदा ही त्या देशाची प्रतिमा त्याआड येत आहे. दुसरीकडे त्यावरूनच ‘फायनान्शियल टास्क फोर्स’कडून ‘काळय़ा यादी’त टाकले जाण्याची भीतीही पाकिस्तानला सतावते आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदच्या अटकेचा बनाव घडवून आणला गेला आहे का? दहशतवादाविरोधात आपण कारवाई करीत आहोत यासाठी या अटकेची धूळफेक केली गेली आहे का? पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे ‘यशस्वी’ प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. हा नाटकाचा तिसरा यशस्वी प्रयोग असल्याचे सेनेने म्हटले आहे.