मुंबई -राज्याचे उपलोकायुक्त म्हणून निवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांनी आज (शुक्रवार) शपथ घेतली. ते आजपासूनच रुजू झाले आहेत. मुख्य सचिव डी. के. जैन यांनी पडसलगीकर यांना पदग्रहणतेची शपथ दिली.
पडसलगीकरांच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे २ वर्षांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाची बाब चव्हाट्यावर आली, त्यानंतर केंद्राकडून तो फेटाळला गेल्याने राज्य सरकार व पडसलगीकर यांना नामुष्की पत्करावी लागली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर पुढच्या नियुक्तीचा प्रस्ताव तातडीने बनवून घेतला. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्याला राज्यपालांची मंजुरी मिळविली. त्यामुळे आता पुढील ५ वर्षांसाठी उपलोकायुक्त पदावर ते राहतील. त्यामुळे खात्यात असताना राज्यकर्ते व त्यांच्या धोरणाच्या दबावामुळे पूर्णपणे मनासारखे काम करता न येण्याची कसर पडसलगीकर यांना आता, या पदावरुन भरुन काढता येणे शक्य आहे.
शपथघेताना सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रारंभी राज्यपालांच्या अधिपत्राचे वाचन केले. या प्रसंगी आमदार अॅड. आशिष शेलार,गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार,महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी,महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष गौतम चॅटर्जी,उपलोकायुक्त शैलेश कुमार शर्मा,कोकण विभागाचे राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड आदींसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.