मुंबई - विवादित एल्गार परिषदेच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या पी वरवरा राव आणि शोमा सेन यांच्या वकिलांकडून विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभीवर जामीन मिळण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
पी वरवरा राव यांचे वकील आर सत्यनारायण यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल करताना म्हटले, की वरवरा राव यांचे वय 80 वर्ष आहे. त्यांना या वयात उच्च रक्तदाब आणि इतर आजार आहेत. तळोजा तुरुंगात सध्या त्यांना मागणी करूनही वेगळ्या बराकीत ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोनासारखा आजार त्यांना होण्याची दाट शक्यता आहे. वरवरा राव यांना श्वसनाचा त्रास असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांच्या वकिलाने न्यायालयासमोर म्हटले आहे.
या प्रकरणातील दुसऱ्या महिला आरोपी शोमा सेन यांचे वकील शरीफ शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले, की शोमा सेन यांचे वय 61 वर्ष आहे. सध्या त्या मुंबईतील भायखळा महिला कारागृहात आहेत. शोमा सेन यांना उच्च रक्तदाब यासह इतर आजार आहेत. कोरोनाची लागण या वयातील व्यक्तींना होण्याची दाट शक्यता असल्याने तात्पुरता जामीन मंजूर करण्यात यावा. कोर्टाने दिलेल्या अति शर्थीचे पालन केले जाईल, अशी शाश्वती या दोघांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भात सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी आरोपींच्या जामीन याचिकेला विरोध केला आहे. दोन्ही आरोपींकडून कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने या पुढील सुनावणीपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. एल्गार परिषद प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यात पी वरवरा राव , सुरेंद्र गडलिंग , रोणा विल्सन , सुधीर ढवळे , वर्णन गोंनसलविस , अरुण फारेरा , महेश राऊत , सुधा भारद्वाज आणि शोमा सेन यांचा समावेश आहे.