मुंबई - कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आरसीएफ कंपनीच्या सहाय्याने येत्या दोन ते तीन आठवड्यांत हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा - राज्यात लागणार टाळेबंदी, लवकरच मुख्यमंत्री करणार घोषणा
ऑक्सिजन प्लांट उभारल्यास ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन हजारो कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशाच रीतीने दक्षिण-मध्य मुंबईतील अन्य कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये बीपीसीएल, एचपीसीएल, इंडियन ऑईल यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात येणार आहेत.
येत्या दोन-तीन आठवड्यांत प्लांट कार्यान्वित होणार
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान लागणाऱ्या ऑक्सिजनचा राज्यभरात तुटवडा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी बाहेरील राज्यांतून ऑक्सिजन मागविला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. खासदार शेवाळे यांच्या पुढाकाराने, पूर्व उपनगरातील पं. मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयाच्या डीन डॉ. माने आणि एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत झालेल्या प्राथमिक बैठकीत ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या योजनेला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आरसीएफ कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून मदत करण्यास तयारी दर्शविली असल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी दिली. या प्लांटमधून 9 किलो ऑक्सिजन असणारे सुमारे 102 सिलेंडर्सचा पुरवठा केला जाणार असून येत्या दोन-तीन आठवड्यांत हा प्लांट कार्यान्वित केला जाणार आहे.
अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय
ऑक्सिजनच्या अभावी गेल्या काही दिवसांत शताब्दी रुग्णालयातून सुमारे 44 रुग्णांना इतरत्र हलवावे लागेल होते. ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी रुग्णालय प्रशासन, पालिका अधिकारी आणि आरसीएफच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळू शकेल, असे शेवाळे यांनी सांगितले.
हेही वाचा - 'ब्रेक द चेन’ : राज्य शासनाकडून 'या' दुकानांना वेळेचे निर्बंध; होम डिलिव्हरीस मुभा