नागपूर- मराठी नाट्य संमेलनामध्ये परिसंवाद आयोजित करून रंगभूमीशी निगडित प्रश्नावर चर्चा करण्याची मोठी परंपरा आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनही त्याला अपवाद ठरले नाही. यावर्षी 'नाटक: जगण्याची समृद्ध अडगळ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
लेखक नाटककार शफाअत खान यांनी या परिसंवादाचे प्रास्ताविक केले. दिग्दर्शक अतुल पेठे, तरुण दिग्दर्शक आशुतोष पोद्दार, दिग्दर्शक आणि एनएसडीचे माजी संचालक वामन केंद्रे, मुलांसाठी काम करणाऱ्या ग्रीप्स थिएटरमध्ये कार्यरत असलेली अभिनेत्री विभावरी देशपांडे हे या परिसंवादात सहभागी झाले होते.
अतुल पेठे यांनी सुरुवातीला अडगळ या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना माळ्यावर राहूनही जी टाकून द्यावीशी वाटत नाही, ती समृध अडगळ असते, अशी व्याख्या केली. मात्र, नाटक आणि नाटककारांना टोकाचा विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी विरोध केला. स्वातंत्र्य विचाराची जेवढी एखाद्या सेवकाला गरज असते तेवढीच ती समाजाला ही असावी लागते, तरच तो विचार अडगळीत न पडता व्यक्त व्हायचे धाडस दाखवू शकतो, असे त्यांनी सांगितले.
तर आशुतोष पोद्दार यांनी या अडगळीचा वेगळा अर्थ काढला. नाटक करताना मला मीच अडगळ वाटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. नाटक हे आपल्याला हवे ते मंचावर मांडण्याची प्रक्रिया वाटते, असे ते म्हणाले. एक कलाप्रकार दुसऱ्या कलाप्रकाराला मागे अडगळीत टाकून पुढे जात असल्याचे सांगताना त्यांनी किर्तन आणि लावणीचे उदाहरण दिले.
विभावरी देशपांडे यांनी लहान मुलांच्या अनुशंगाने सादर होणाऱ्या नाटकात दर ५ वर्षांनी बदल करणयाची गरज व्यक्त केली. विषय आणि अनुभवविश्वात वेळीच बदल केले नाहीत, तर नाट्यकला त्यांच्यासाठी कायमची अडगळीत पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
परिसंवादचा सार उलगडून सांगताना वामन केंद्रे यांनी नाटक ही कला आदिम असल्याने ती कधीच अडगळीत पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. नाटकांना होणारा विरोध हाही आजचा नसून अनेकदा झालेला आहे. इंग्रजांनीही नाटकांना विरोध केला. मात्र, एखाद्या गोष्टीला विरोध झाला, तर ती मांडण्याची उर्मी तीव्र होते. याबाबतीत नाट्यकला जास्त सुदैवी असून आपल्याला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याची संधी ही कला देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत नाटक जिवंत राहणार आहे. त्यामुळे ते कधीच जगण्याची समृद्ध अडगळ ठरणार नाही, असा विश्वास व्यक्त करत या परिसंवादाची सांगता झाली.