मुंबई : अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत विविध कार्यक्रम राबवले आहेत. गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अवयव दानाच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहेत. या कारणासाठी अवयव दान करण्यास अनेकजण पुढे सुद्धा येऊ लागले आहेत. मेंदू मृत व्यक्तीकडून अवयव दानासाठी अनेकदा उशीर होताना बघायला भेटतो. अशात अवयव दानाची प्रतीक्षा यादीही फार मोठी आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्याने कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अवयव दान केल्यास ते फार मोलाचे ठरते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच केंद्र सरकारने अवयवदान करणाऱ्या कर्मचाऱ्याला ४२ दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे.
४२ दिवसांची विशेष रजा: अवयव दान करण्यासाठी अवयव दात्यास शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये भर्ती व्हावे लागते. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्यानंतर दात्याची प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी सुद्धा बराच कालावधी जातो. त्यामध्ये जर पूर्णपणे विश्रांती घेतली नाही तर दात्याची प्रकृती सुद्धा ढासळू शकते. ह्या सर्व बाबींचा विचार करून केंद्राने, केंद्रीय कर्मचाऱ्यास ४२ दिवसांची विशेष रजा देण्याचे घोषित केले आहे. तसेच ही रजा इतर कुठल्याही रजेसोबत जोडून घेता येणार नाही. काही अपवादात्मक परिस्थितीत जर शस्त्रक्रियेमध्ये काही गुंतागुंत निर्माण झालीच तर अधिकृत डॉक्टरांच्या संमतीने ही रजा वाढवून घेता येऊ शकेल. तसेच या रजेमुळे अवयव दात्यास नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.
राज्याने सुद्धा निर्णय घ्यावा : केंद्राच्या या निर्णयावर बोलताना राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत म्हणाले आहेत की, हा निर्णय फारच स्वागताहार्य आहे. कारण अवयव दानाची फारच मोठी गरज आज भारतात, महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून बरीच लोक अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. किडनीसाठी तर फार मोठी वेटिंग लिस्ट आहे. फुफ्फुस, त्वचा आहे. अशाप्रकारे खूप लोकप्रतिक्षेत आहेत आणि केंद्र सरकारचा हा निर्णय लोकांना जागृत करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. अवयव दानासाठी आपण ग्रीन कॉरिडॉर केलेला आहे. तसेच परदेशी लोक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अवयव दानासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तसेच आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विनंती करणार आहे की, केंद्राप्रमाणे राज्याने सुद्धा याबाबत विचार करावा. अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा, असेही डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितले आहे.
मन की बात मध्ये मोदींनी केली होती प्रशंसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या ९९ व्या, मन की बात, या कार्यक्रमात अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले होते. आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या या टप्प्यात अवयव दान म्हणाजे, एखाद्याला जीवन देणे हे फार मोठ माध्यम बनल असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूनंतर त्याचा शरीर दान करते. तेव्हा त्या दानातून ८ ते ९ जणांना एक नवं आयुष्य भेटण्याची शक्यता निर्माण होते. आज देश देशात अवयव दान करण्यासाठी जागरूकता वाढत चालली आहे. २०१३ यावर्षी आपल्या देशात अवयवादानाच्या ५ हजार पेक्षाही कमी प्रकरण होती. परंतु २०२२ मध्ये त्यामध्ये वाढ होऊन १५ हजारहून अधिक प्रकरणे झाली असून अवयव दान करणाऱ्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबीयांनी फार मोठे पुण्याचे काम केले आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.
हेही वाचा: Spanish Women Organ Donation परदेशी महिलेचे अवयवदान मुंबईत पाच जणांना मिळाले जीवदान