मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला आहे. अधिवेशनाच्या शेवटचा आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गुढीपाडवा तोंडावर आला असताना आनंदाचा शिधा अद्याप मिळालेला नाही, नुकसान भरपाई मिळत नाही, या मुद्द्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा : अवकाळी पावसामुळे आणि गारपीट होत असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षे, कांदे, भाजीपाला आदीला हमीभाव मिळत नाही. सरकारकडून शेतकऱ्यांना भरीव निधीची तरतूद केल्याचे घोषणा केली जाते. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे पंचनामे देखील झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम शेतकऱ्यांच्या नुकसानीवर होत आहे. अशातच गुढीपाडवा सण तोंडावर आल्याने विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा दिल्या.
विरोधकांची सरकारच्या कारभारावर सडकून टीका : विरोधकांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. राज्यातील उद्योग बाहेर चाललेले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. राज्य सरकारने यावर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली. या अगोदर देखील विरोधकांनी अनेकदा विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आल्या, मात्र सभागृहामध्ये त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यावेळी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते.
सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाला भोपळा : राज्याचा र्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी हातात भोपळा घेऊन आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यावेळी विरोधक आक्रमक झाले होते. यावेळी सर्व विरोधक विधानभवनाच्या एकवटले होते. अंबादास दानवे, अदिती तटकरे, रविंद्र वायकर, रोहित पवार, जयंत पाटील, हे मंत्री उपस्थित होते. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होते. सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाला भोपळा, अशा घोषणा फलक हातात घेऊन दिल्या होत्या.