मुंबई - राज्यातल्या सत्तेत शिवसेनेसोबत काँग्रेस एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत मात्र काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा शिवसेनेला अडचणीत आणण्याचे धोरण काँग्रेसने ठरवले असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. आता नालेसफाई कामातील खोट्या आकडेवारीवरून काँग्रेस शिवसेनेला घेरण्याच्या तयारीत आहे. लवकरच याबाबतची खरी स्थिती समोर आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नालेसफाईवरून काँग्रेस - शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे.
'नालेसफाईचे आकडे फुगवले जात आहेत'
मुंबई महापालिकेने शहरात १०२ टक्के, पूर्व उपनगरात ९३ टक्के तर पश्चिम उपनगर ९६ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. या आकडेवारीवर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्षेप घेतला आहे. 'पालिकेचा हा दावा खोटा असून ठेकेदारांना मदत करण्यासाठी नालेसफाईचे आकडे फुगवले जात आहेत. महापालिका मुंबईतील नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यावरून पालिका सभागृहात जोरदार वाद रंगतो. प्रशासनाकडून नालेसफाईची खरी माहिती दिली जात नाही. नालेसफाई समाधानकारक झालेली नसताना आकडे फुगवून नालेसफाईचा दावा केला जातो. मात्र हा दावा नेहमीप्रमाणे खोटा आहे. लवकरच याची खरी माहिती समोर आणली जाईल', असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
'वर्षभर नालेसफाई करा'
'दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई हाती घेतली जाते. त्याऐवजी वर्षभर नालेसफाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे', असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
नाल्यातील गाळ कुठे गेला?
'पालिकेने समाधानकारक नालेसफाई केली तर नाल्यातील गाळ गेला कुठे? हा गाळ कुठे टाकला? याची माहिती पालिका देत नाही. मग नालेसफाईची आकडेवारी आलीच कुठून?', असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थितीत केला आहे. नालेसफाईच्या मुद्दयावरून आता काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - संभाजीराजे आज घेणार शरद पवारांची भेट; मराठा आरक्षणावर होणार चर्चा