मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. ठाणे, नागपूर जिल्हा यात आघाडीवर असून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत असा घणाघात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी केला. पुरवणी मागण्यावर दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले.
उघडपणे कायदा हातात : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हे सरार्स जनतेला, अधिकाऱ्यांना धमक्या देऊन उघडपणे कायदा हातात घेत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधाऱअयांवर बोलण्याची संधी सोडली नाही. आमदार, खासदार यांची कमी केलेली सुरक्षा, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील प्राणघातक हल्ला, खासदार संजय राऊत व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जीवाला असलेला धोका. लोकप्रतिनिधीवर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे, शिवसेना जिल्हाधिकाऱ्याची हल्ला, पत्रकार शशिकांत वारिसे हत्याप्रकरण या घटनांचा पाढा वाचत दानवे यांनी सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. ठाण्यात काही लोकांना पैसे देऊन सुरक्षा दिली जात आहे. चांगली बाब आहे मात्र हे तेव्हा घडते जेव्हा धमकीचा कॉल येणारे लोक शिंदे गटात जातात. त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांना सरकारी सुरक्षा मोफत दिली जाते. हे सरकार गुंडांच्या संरक्षणासाठी आहे की लोकशाहीने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्यासाठी आहे, असा सवाल देखील दानवे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
हिंगोली, कळंबोलीत मोठया प्रमाणात अवैध जुगार : हिंगोली, कळंबोलीत मोठया प्रमाणात अवैध जुगार सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. संभाजीनगर मधील एसीपीने महिलेशी केलेल्या गैरवर्तनानंतर त्यांची मेडिकल चाचणी न करता त्यांना अटक करून जामीन मिळवला. अशा पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी दानवे यांनी केली. एकीकडे सर्वसामान्य जनतेचे सरकार सांगायचे. रामराज्य व शिवशाहीच राज्य म्हणायचे. महापुरुषांचा महाराष्ट्रात सांगायचं आणि कायदा हातात घेण्यास मुभा द्यायची. सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यस्थेचा फज्जा उडाला आहे. माता भगिनी सुरक्षित नाहीत. सत्ताधारी पक्षाचे अनेक लोक गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप कायदा व सुव्यस्थेप्रकरणी दानवे यांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल चढवला.