मुंबई : वृत्तपत्रातील जाहिरातींवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज शिंदे सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या जाहिराती कोण देत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय जाहिरातीसाठी त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, याची चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र : आज पूर्णपणे जाहिरात बदलेली आहे, दोन्ही पक्षांची चिन्हे आहेत. कालच्या जाहिरातीवर जी चर्चा झाली त्यावर त्यांनी दुरुस्ती करून आज जाहिरात केली आहे. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या संदर्भात कोठेही उल्लेख नाही, त्याचा खुलासा केले गेलेला नाही. जर कालच्या जाहिरातीतील आकडेवारी बघितली तर, शिंदे फडणवीस सरकार यांचे आकडे पाहिले तर ५० टक्के लोकांनी पसंती होते. तर ५० टक्के लोकांना हे सरकार नको आहे. आज नऊ मंत्र्यांची माळ लावलेली आहे. मग त्यात भाजपचे मंत्री का नाहीत. त्यातले ५ मंत्री वादग्रस्त आहेत. मग ह्या मंत्र्यांवर तुमचा पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे का? या फोटोच्या माध्यमातून तुम्ही तो केलाय का याचे उत्तर द्यावे.
हितचिंतक कोण : जनतेच्या मनात काय हे निवडणुका झाल्यानंतर समोर येईल. मग निवडणुकीला सामोरे जा. महानगर पालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार होत्या त्या तरी घ्याव्यात. ह्या जाहिरातीचा खर्च कोणी केला, याची चौकशी व्हायला हवी. सरकारच्या जाहिरातीचा खर्च हा जनतेचा असतो. ज्यांच्या पाठिंब्यावर हे मुख्यमंत्री झालेत, त्याच पक्षाला हा खोडसाळपणा वाटतं आहे. कालच्या आणि आजच्या जाहिरातीचा कोणी खर्च केला हे कळले पाहिजे.
संरक्षण दिले जाते : ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यात काही व्यक्तींना संरक्षण देण्यात आला आहे. 100 जणांना संरक्षण दिल्याची माहिती मिळत आहे. त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, ह्याची मी माहिती मागतोय. हे सरंक्षण कोणाकोणाला देण्यात आले आहे. ह्याची माहिती मिळायला हवी. यात व्यावसायिक आहेत. निम्म्याहून अधिक लोक आहेत ज्यांना संरक्षणाची गरज नाही. सरकारने ठाणे जिल्ह्यात किती लोकांना सरक्षण दिले आहे याची यादी द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. सरक्षण देणे हे चुकीच नाही, पण फक्त आपण सरकारमध्ये आहोत आणि आपल्या जवळच्यांना देणे चुकीचे आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता : ठाण्यातील पोलिस अधिकारी शेखर बागडे यांनी मोठी मालमत्ता जमवली आहे. बेहिशोबी मालमत्ता तो कसा जमा करू शकतो. सरकारने त्याची चौकशी करावी. राज्यात सरकारचा दरारा राहिलेला नाही, अशी परिस्थिती दिसते. शेखर बागडे याची ACB चौकशी करावी अशी मागणी मी गृहमंत्री यांच्याकडे करतो.
देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक : स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाणाऱ्यांची कोंडी कोणीही करू शकत नाही, अशा प्रकारे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केले आहे. कोणी कोणाची प्रगती रोखू शकत नाही. त्यांच्या मागे ९०-९५ आमदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. त्यांच्या पीएला फोन केला. त्यांनी मग त्यांच्याकडे फोन दिला. त्यावेळेस राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे म्हणाले.