मुंबई - सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुक बॅलेट पेपरवर घेण्याची जोरदार मागणी केली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. त्यामुळे देश आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी बॅलेट पेपरची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या पुढाकाराने देशभर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पत्रकार संघात सर्वपक्षीय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्वपक्षियांनी सरकार व निवडणूक आयोग जनतेच्या मागणीला गंभीरपणे घेणार नसेल, तर राज्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे. 9 ऑगस्ट या क्रांती दिनी देशभर पुकारण्यात आलेल्या 'ईव्हीएम हटाव, देश बचाव', बॅक टू बॅलेट' या आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच 9 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईत होत असलेल्या क्रांती मैदान ते चैत्यभूमी या लाँग मार्चमध्ये सक्रीय सहभागी होत असल्याची घोषणा सर्वच नेत्यांनी केली आहे.
याबरोबरच विविध पक्षांच्या वतीने 9 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात 'बॅक टू बॅलेट'साठी आंदोलन होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला उपस्थित नेते -
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
- जयंत पाटील, जनरल सेक्रेटरी, शेकाप
- माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रीय महासचिव, जनता दल सेक्युलर
- कॉम्रेड अशोक ढवळे, केंद्रीय समिती सदस्य
- राजू शेट्टी, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
- कॉम्रेड प्रकाश रेड्डी, मुंबई महासचिव, सीपीआय
- मिराज सिद्दिकी, मुंबई महासचिव, समाजवादी पक्ष
- कपिल पाटील, शिक्षक आमदार, लोकभारती
- धनंजय शिंदे, राज्य समिती सदस्य, आप